परभणी- पोलिसात अनेक गुन्हे दाखल असलेल्या जावयाचा सासू आणि पत्नीने खून केला आहे. 30 वर्षीय या जावयाला दगड-विटांनी ठेचून ठार केल्याची ही घटना परभणी शहरातील जमजम कॉलनी या भागात काल (मंगळवारी) रात्री घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसात मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. सासू आणि पत्नीला अटक करण्यात आली आहे.
खून झालेल्या जावयाचे नाव अलीम काजी (वय 30 वर्षे), असे आहे. या प्रकरणी आज (दि. 18 नोव्हेंंबर) कोतवाली पोलिसात मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सासू आणि पत्नी अशा 2 आरोपींना अटक केली आहे. मृत अलीमवर मोबाइल चोरीसह हाणामारी व छोट्या-मोठ्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
'दोन वर्षांनंतर परतला होता घरी'
अलीम काजीवर अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यामुळे तो नेहमीच फरार असे. गेल्या दोन वर्षांपासून तो बेपत्ता होता. तब्बल दोन वर्षाच्या कालावधीनंतर तो दोन-तीन दिवसांपूर्वी परभणीत आला होता. मंगळवारी (दि. 17 नोव्हेंबर) रात्री दारू पिऊन तो पत्नीसोबत वाद घालू लागला. माझ्यासोबत चल असे म्हणत, त्याने गोंधळ घातला. या भांडणाचे रुपांतर मारहाणीत झाले. याच रागातून त्याच्या पत्नीसह सासुने दगड, विटांनी ठेचून त्याला जागीच ठार मारले. याबाबत घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे हे करीत आहेत.