सांगली- सांगलीतील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या पत्नीने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गीता अनिल शेटे (वय ३८ वर्षे), असे या विवाहित महिलेचे नाव आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - सांगली गुन्हे बातमी
सांगलीतील शिवसेनेचे पदाधिकारी अनिल शेटे यांच्या पत्नी गीता शेटे यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. विश्रामबाग पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
शिवसेनेचे सांगली शहर पदाधिकारी असणारे अनिल शेटे यांच्या त्या पत्नी आहेत. गुरुवारी (दि. 16 जुलै) सकाळी त्या घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांनतर घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला होता. दुपारच्या सुमारास त्यांच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या मीरा हाऊसिंग सोसायटीमधील एका पडक्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आला. त्यानंतर तेथील नागरिकांनी पोलिसांना याची कल्पना दिली. यानंतर बचाव पथकाच्या माध्यमातून मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन करण्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे. मात्र, गीता शेटे यांनी ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.