नांदेड - शहरातील गुरूकृपा ज्वेलर्समध्ये अज्ञात दरोडेखोरांनी शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोडा टाकला. या दरोड्यात अज्ञात आरोपींनी व्यापारी रविंद्र चक्रवार यांना कैचीने भोकसले. यात रविंद्र यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेत दरोडेखोरांनी दुकानातील लाखो रुपयांचे दागिने पळवले आहेत. या घटनेने सराफा बाजारासह नांदेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरोडेखोरांनी व्यापारी रविंद्र यांच्यावर कैचीने हल्ला केला. त्यात रविंद्र हे गंभीर जखमी झाले. हे पाहून दरोडेखोर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने लुटून पसार झाले. महत्वाचे म्हणजे चोरट्यानी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रात्री शहरात जोरदार पाऊस सुरू होता, त्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी हे कृत्य केले.
विशेष म्हणजे घटना घडल्यानंतरही बराच वेळ याबाबत कुणालाच काही समजले नसल्याचे समजते. वडिलांना घरी यायला नेहमीपेक्षा उशीर झाल्याने मुलाने मोबाईलवर फोन करून पाहिले. पण रविंद्र चक्रवार यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे मुलाने दुकान गाठले, तर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.