परभणी - शहरातील वसमत रोडवरील दत्तधाम परिसरात असलेल्या शांतीनिकेतन कॉलनीत गुरुवारी पहाटे दरोडेखोरांनी एका कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करून त्या घरातील सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या मारहाणीत जखमी झालेल्या सात पैकी एका महिलेचा शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर या महिलेच्या एका मुलाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
दरोडेखोरांनी मारहाण केलेल्या 'त्या' कुटुंबातील महिला ठार ; परभणीत घडली होती घटना - उपचारादरम्यान मृत्यू झाला
दरोडेखोरांनी एका कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करून त्या घरातील सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या मारहाणीत जखमी झालेल्या सात पैकी एका महिलेचा शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शांतीनिकेतन कॉलनीत वासुदेव चक्रवार यांच्या घरावर चोरट्यांनी गुरुवारी पहाटे दरोडा टाकला. घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरटे घरात घुसले. या चोरट्यांनी घरातील सदस्यांना लाकूड आणि रॉडने मारहाण केली. तसेच महिलांच्या कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. या मारहाणीत वासुदेव चक्रवार, सविता चक्रवार, प्रेमला मालेवार, चंद्रकला पद्मावार, ऋषी चक्रवार, अंकिता चक्रवार व हरीश चक्रवार असे सात जण जखमी झाले होते. या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर हरीष चक्रवार हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या जखमींपैकी सविता चक्रवार यांचा आज शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मुलाने केलेल्या आरोपांप्रमाणे त्यांची आई दरोडेखोरांच्या मारहाणीमुळे प्रचंड घाबरलेली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची निष्काळजी व त्यांच्याकडून योग्य उपचार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी दरोडेखोरांना तर पकडावेच पण जिल्हा प्रशासनाने सामान्य रुग्णालयातील कामचुकार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी चक्रवार यांनी केली आहे. सविता चक्रवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर चोरीचा पोलीस अधिकारी तपास करित आहे. अजूनही चोरांचा सुगावा लागला नाही.