मुंबई -गेल्या २ वर्षांपासून मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातील रस्त्यांवर लावलेल्या दुचाकी चोरून अर्ध्या किमतीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकणाऱ्या टोळीतील दोन जणांना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंच युनिट ११ने अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहमद अली इम्तियाज अनंदले (१९) अफझल अकसर खान (१९) या २ आरोपीना अटक केली आहे. मोहमद अली इम्तियाज अनंदले हा आरोपी हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. यात आणखी एकाचे नाव समोर आले असून तो अल्पवयीन आहे. त्याच्या अटकेची कारवाई सुरू आहे.
दुचाकी चोरून कॉलेज विद्यार्थ्यांना विकणाऱ्या टोळीला अटक; आरोपीत हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी - पोलिसांकडून दोघांना अटक
मुंबईतील दुचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला मुंबई पोलीस क्राईम ब्रॅंच युनिट 11ने अटक केली आहे. पोलिसांनी मोहमद अली इम्तियाज अनंदले (१९), अफझल अकसर खान (१९) या आरोपीना अटक केली आहे. मोहमद अली इम्तियाज अनंदले हा हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी दुचाकी वाहने लावण्यात येत आहेत. याचा फायदा उचलत बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकी चोरण्याच्या घटना वाढल्याचे समोर आले होते. यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंच युनिट ११ कडून या संदर्भात तपास केला जात होता. १५ जुलै राजी मुंबईतील मालाड परिसरात काही जण चोरलेली वाहने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मालाड पश्चिम परिसरात सापळा रचला होता. या ठिकाणी २ तरुण दुचाकी घेऊन आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. पोलीस चौकशीत आरोपी उडवा-उडवीची उत्तर देत असल्याचे लक्षात येताच पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या टोळीने चोरलेल्या ४ दुचाकी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. या गाड्या मुंबईतील डी. एन. नगर पोलीस ठाणे, एम.आय.डि.सी. पोलीस ठाणे, आरे पोलीस ठाणे व साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे समोर आले आहे. चोरलेल्या वाहनांचे नंबर प्लेट बदलून कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गाठून त्यांना अर्ध्यां किमतीत हे आरोपी या दुचाकी विकत होते.या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.