धुळे -शहरातील चाळीसगाव रोड परिसरात युवकाला मारहाण करुन चाकूने वार करत त्याचा खून केल्याची घटना रविवारी (दि. 9 ऑगस्ट) रात्री घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यातील आरोपी हा मृत युवकाचा मामा असल्याचे सांगितले जात आहे.
अब्दुल बाशीत अब्दुल्ला खान, असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत युवकाचे वडील अब्दुल्ला आतीकुर रहेमान खान (रा. जामचा मळा, मुल्ला कॉलनी, धुळे) यांनी चाळीसगाव रोड पोलीसा ठाण्यात तक्रार दिली आहे. अब्दुल रज्जाक लियाकत खान (मृताचा मामा), इमरान खान अब्दूल रज्जाक खान, पल्लू अब्दुल रज्जाक खान, इकराम रज्जाक खान व इजार उर्फ राजा रज्जाक खान (सर्व रा. मुल्ला कॉलनी, चाळीसगावरोड, धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, सर्व आरोपी हे त्यानुसार रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील चाळीसगाव रोडवरील साबीर यांच्या कॉम्प्लेक्सजवळ मृत अब्दुल बाशीत याला तुझ्या वडिलांनी मिटींग का घेतली, असे विचारणा करत मारहाण केली. तर इमरान खान अब्दूल रज्जाक खान याने त्याच्या हातातील चाकूने बाशीत याच्या पोटाचे मागील बाजुस भोकसले. यात बाशीतचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मशिदीत सोशल डिस्टंसिंगवरुन झाला होता वाद
येथील व्यापारी संकुलामागे दारुसलाम मशिदी समोरील सार्वजनिक जागेत बैठक होती. बैठकीत तक्रारदार अब्दुल्ला यांचा मेहुणा अब्दुल रज्जाक लियाकत खान याने अब्दुल्ला खान यांना सांगितले की , ''तुम्ही मशिदीत नमाज पठण करण्यासाठी आल्यानंतर सोशल डिस्टंसिंग ठेवले नाही, तर मशिदीला कुलूप लावेल.' यावर मशीद कोणाच्या बापाची नाही असे,अब्दुल्लाने अब्दुल रज्जाकला बजावले. यावरुन वाद निर्माण झाला होता.