न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या लॉनवर विशेष योग सत्रानंतर बुधवारी वॉशिंग्टन डीसीला रवाना झाले. 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने सर्वाधिक राष्ट्रांच्या लोकांनी योगासने केल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला.
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांसोबत डिनरचे आयोजन :22 जून रोजी वॉशिंग्टन डीसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक स्वागत केले जाईल. संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन करतील. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. 23 जून रोजी पंतप्रधान मोदींना अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहभोजनाचे आयोजन केले जाईल.
नरेंद्र मोदींचे संबोधन : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी, 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा योग सुमारे 20 मिनिटे चालला. योग कार्यक्रमाचे नेतृत्व सुरू करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी येथे उपस्थित लोकांना संबोधित केले. ते म्हणाले की कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचे आभार. तुमच्यापैकी बरेच जण दूरच्या ठिकाणाहून आले आहेत, ज्याचे मला कौतुक वाटते. ते म्हणाले की, आपली हजारो वर्षांची परंपरा असलेल्या भारतातून योग आला आहे.