महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Plane Crash In Russia : ब्लादिमीर पुतीन यांना जेरीस आणणाऱ्या प्रिगोझिन यांचं जेट विमान 'क्रॅश', अपघातात सगळे प्रवासी ठार झाल्याची भीती - yevgeny prigozhin death News

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात भाडोत्री सैनिकांनी बंड केलं होतं. या भाडोत्री सैनिकांचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला. नंतर मात्र त्यांच्यावरचे सर्व गुन्हे मागे घेत येवगेनी प्रिगोझिन यांना बेलारुसला पाठवण्यात आलं होतं. खासगी जेट विमान क्रॅश झाल्यानं त्यात येवगेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू झाल्याचे रशियाच्या माध्यमांनी म्हटले आहे. पुतीन यांचे 'बेस्ट मॅन' ते पुतीन यांचे देशांतर्गत सर्वात मोठे विरोधक या प्रवासात प्रिगोझिन यांना त्यांच्या बंडामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली.

Plane Crash In Russia
येवगेनी प्रिगोझिन

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 7:22 AM IST

Updated : Aug 24, 2023, 9:51 AM IST

मॉस्को :रशियामध्ये खासगी जेट विमान क्रॅश झालं असून या विमानातील सगळे प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या विमानात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना घाम फोडणारे येवगेनी प्रिगोझिन यांचा समावेश असल्याची माहिती रशियाच्या वृत्तसंस्थेनं दिली आहे. त्यामुळे ब्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात बंड करणाऱ्या 'वॅग्नर' गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातं आहे.

खासगी जेट विमान झालं क्रॅश :'वॅग्नर' गटाच्या बंडखोर सैनिकांचे नेता येवगेनी प्रिगोझिन हे मॉस्को ते सेंट पिटसबर्ग दरम्यान खासगी जेट विमानानं प्रवास करत होते. यावेळी हे खासगी जेट विमान मॉस्कोच्या उत्तरेस 100 किमी अंतरावर 'क्रॅश' झालं. या विमानात असलेल्या सातही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं रशियाच्या रोसाव्हिएटियानं दिलेल्या यादीत स्पष्ट केलं आहे. या यादीत क्रॅश झालेल्या खासगी जेट विमानात असलेल्या सात प्रवाशी आणि तीन क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. रशियाच्या हवाई वाहतूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या मृतांच्या यादीत 'वॅग्नर'चे सहसंस्थापक दमित्र अतकिन यांच्याही नावाचा समावेश आहे.

अपघात की 'घातपात'? :दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा रशियातल्या काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. प्रिगोझिन यांनी रशियाविरोधात बंड केल्यामुळे त्यांचा मृत्यू घडवण्यात आल्याचा काही माध्यमांचा अंदाज आहे. 'वॅन्नर'चा संपूर्ण बिमोड करण्यासाठी प्रिगोझिन यांना सर्वार्थानं हटवणं पुतीन यांच्यासाठी गरजेचं होतं. त्यातूनच हा घातपात घडवून आणला असण्याची शक्यता तिथल्या काही माध्यमांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासकांच्या मते, अमेरिकेने फासावर चढवलेल्या इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेनप्रमाणेच प्रिगोझिन यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी पूर्ण योजना करून ठेवली होती. त्यामुळे या विमानातून येवगेनी प्रिगोझिन यांच्याच नावाने त्यांचे सुरक्षारक्षक किंवा 'वॅग्नर'शी संबंधित कुणी प्रवास करत असण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. या 'क्रॅश' मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटेपर्यंत प्रिगोझिन यांच्या मृत्यूबद्दल ठोस दावा करता येणार नाही.

'वॅग्नर' भाडोत्री सैनिकांनी केला होता विद्रोह :रशियात ब्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात वॅग्नर' या भाडोत्री सैनिकांनी बंड पुकारलं होतं . 'वॅग्नर'चे सैनिक रशियातल्या महत्वाच्या ठिकाणावर कब्जा करत होते. ब्लादिमीर पुतीन यांना हे बंड मोडून काढण्यात लवकरच यश आलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी 'वॅग्नर'च्या बंडाला देशद्रोह संबोधून लवकरच त्याचा बिमोड करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र बंड मोडून काढल्यानंतर 'वॅग्नर' प्रमुख असलेल्या येवगेनी प्रिगोझिन यांच्यावरील सगळे आरोप मागे घेण्यात आले. त्यांना माघारीची संधी देऊन बेलारुसला पाठवण्यात आलं.

हवाई दलाच्या कमांडरला केलं बडतर्फ :युक्रेनमध्ये रशियाचं 'वॅग्नर' हे भाडोत्री लढाऊ सैन्य मैदान गाजवत होतं. या सैन्याला मागं घेण्याचं आवाहन रशियन हवाई दलाच्या कमांडर असलेल्या जनरल सर्गेई सुरोविकिन यांनी केलं होतं. जनरल सर्गेई सुरोविकिन यांनी युक्रेनमध्ये रशियाच्या ऑपरेशनचं नेतृत्व केलं होतं. 'वॅग्नर' सैन्याला मागं घेण्याचं आवाहन केल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आलं. त्यांच्या बडतर्फीनंतर लगेच वॅग्नर प्रमुख येवगेनी प्रिगोझिन याचं विमान क्रॅश झाल्यानं मोठ्या शंका कुशंका निर्माण होत आहेत. विमान 'क्रॅश' झाल्याचं वृत्त आल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी कुर्स्कच्या लढाईच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भाषण केलं. यावेळी त्यांनी युक्रेनमधील रशियाच्या युद्धातील लढाऊ सैनिकांचा गौरव केला.

हेही वाचा -

  1. Russia Wagner Rebellion: प्रिगोझिन यांचे बंड शमविण्यात पुतीन यांना यश, गुन्हा घेतला मागे
  2. Russia Wagner Rebellion : पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात करार...वॅगनरच्या बॉसने कोणत्या अटींवर दर्शवली सहमती? जाणून घ्या
Last Updated : Aug 24, 2023, 9:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details