रॉबिन्सविले (न्यू जर्सी)World Largest Akshardham Hindu Temple :भारताबाहेर बांधण्यात आलेल्या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचं न्यू जर्सीत 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. BAPS (बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था) स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचं बांधकाम रॉबिन्सविले टाऊनशिप, न्यू जर्सी येथे, 2011 साली सुरू झालं होतं. या बांधकामांत 12 हजार 500 स्वयंसेवकांनी मदत केली होती. मंदिराचे औपचारिक उद्घाटन होण्यापूर्वीच येथे दररोज हजारो लोक दर्शनासाठी येत आहेत. अधरधाम म्हणून ओळखलं जाणारं मंदिर 183 एकर परिसरात बांधण्यात आलंय.
जगातील दुसरं सर्वात मोठे मंदिर :हे मंदिर प्राचीन हिंदू धर्मग्रंथांनुसार बांधलं गेलंय. या मंदिरात 10 हजार शिल्पं पुतळे, भारतीय संगीत वाद्यं, नृत्य प्रकारांसह प्राचीन भारतीय संस्कृतीचं चित्रण करण्यात आलं आहे. हे मंदिर कंबोडियातील अंगकोर वाट नंतरचं दुसरं सर्वात मोठे मंदिर आहे. 12व्या शतकात बांधलेलं अंगकोर वाट मंदिर, 500 एकरमध्ये पसरलेले जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. याला युनेस्कोनं (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषिते केलंय. नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर 100 एकरावर बांधलं आहे. ते 2005 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं.