हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचा चार दिवसाचा दौंरा करुन ते इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इजिप्तमधील 11 व्या शतकातील जुन्या मशीदीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. मात्र इजिप्तमधील या मशीदीचा भारतीय मुस्लिमांच्या दाऊदी बोहरा या समुदायाशी जवळचा संबंध असल्याचे बोलले जाते. दाऊदी बोहरा या समुदायाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही जवळचा संबंध राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाऊदी बोहरा समुदायाला देशभक्त आणि शांततेचे समर्थक असे संबोधले आहे.
काय आहे कैरोतील मशीदीचा इतिहास :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेवरुन इजिप्तच्या भेटीवर जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कैरोतील 1000 वर्षे जुन्या असलेल्या अल हकीम मशीदीला भेट देणार आहेत. ही मशीद 11 व्या शतकात बांधण्यात आली होती. या मशीदीत गेल्या दाऊदी बोहरा समुदायाच्या मुस्लिम समुदायाचे योगदान आहे. त्यामुळे भारतीय दाऊदी बोहरा समुदायातील मुस्लिमांचा या मशीदीशी जवळचा संबंध आहे. गेल्या सहा वर्षापासून या मशीत दुरुस्तीचे काम सुरू आहे. खूप जुनी मशीद असल्यामुळे अनेक ठिकाणी या मशीदीला दुरुस्तीची गरज होती.
पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार पुढे सरसावले :इजिप्तमध्ये दाऊदी बोहरा समुदायातील मुस्लिम नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाची अनेक पर्यटनस्थळे इजिप्तमध्ये आहेत. या पर्यटनस्थळाची देखभाल दुरुस्ती इजिप्त सरकारकडून सुरू आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी इजिप्त सरकार ही दुरुस्ती करत असल्याचे इजिप्त सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मशीदीला भेट देणार असल्याने इजिप्तमधील सरकार त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले आहे.
काय आहे दाऊदी बोहरा समुदायाचा इतिहास :दाऊदी बोहरा समुदाय हा मुस्लिम समुदाय भारतातील गुजरातच्या परिसरात आढळून येतो. हा समुदाय शांतीप्रिय म्हणून ओळखला जातो. दाऊदी बोहरा समुदाय हा इस्लामच्या फातिमीद इस्लामिक तय्याबी शाखेचे पालन करतो. दाऊदी बोहरा समुदायाचा समृद्ध वारसा इजिप्तमध्ये जन्माला आला. मात्र हा समुदाय 11 व्या शतकात येमेनमार्गे भारतात स्थायिक झाला. 1539 नंतर भारतात दाऊदी बोहरा समुदायाची संख्या वाढू लागल्याने त्यांनी आपल्या पंथाची जागा येमेनमधून गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर येथे हलवल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात. गुजरातमधील पाटण परिसरात आजही दाऊदी बोहरा समुदायातील नागरिकांचे वडिलोपार्जित वाडे आहेत. या समुदायातील पुरुष पांढरे कपडे आणि सोनेरी टोप्या घालतात. तर महिला रंगीबेरंगी बुरखे घालण्यासाठी ओळखल्या जातात. दाऊदी बोहरा समुदाय आता महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातला लागून असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने आढळून येतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत दाऊदी बोहरा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दाऊदी बोहरा समुदायांशी खूप जवळे संबंध आहेत. हा समुदायही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खंदा समर्थक आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना दाऊदी बोहरा समुदायाचे धार्मीक प्रमुख सय्यदना बुरहानुद्दीन यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. त्यानंतर बुरहानुद्दीन यांचे निधन झाल्यानंतरही नरेंद्र मोदी त्यांच्या अंत्यविधीला मुंबईत हजर होते. सय्यदना बुरहानुद्दीन यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी असलेल्या त्यांचा मुलगा सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट घेतली होती. त्यांनी सैफी अकादमीच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्घघाटन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी दाऊदी बोहरा समुदायाला आपल्या कुटुंबाचा भाग मानत असल्याचेही स्पष्ट केले होते.
महात्मा गांधीच्या दांडी यात्रेत स्वागत :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाऊदी बोहरा समुदायाला आपल्या कुटूंबीयाचा भाग मानतो असे स्पष्ट केल्यामुळे हा समुदाय त्यांच्याशी किती जवळचा आहे, हे स्पष्ट होते. दाऊदी बोहरा समुदायाशी चार पिढींसोबत नरेंद्र मोदी यांचे घट्ट नाते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही, तर कुपोषणाशी लढा देण्यात या समाजाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ोहते. महात्मा गांधी हे दांडी यात्रेवरुन परत आल्यानंतर दाऊदी बोहरा समुदायाने त्यांचे स्वागत केल्याची माहिती त्यांनी दिली होती.
हेही वाचा -
- PM Modi US Visit : मोदींच्या अमेरिका भेटीतून भारताला काय मिळाले? जाणून घ्या
- Pm Modi address to Indian diaspora : आज भारताची ताकद संपूर्ण जगाच्या विकासाला दिशा देत आहे - पंतप्रधान मोदी