सिडनी : सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित होते. येथे पंतप्रधान मोदी यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मोदी मंचावर पोहचताच उपस्थित लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी संपूर्ण स्टेडियम 'मोदी मोदी' च्या नावाने गुंजत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सिडनी समुदायाच्या कार्यक्रमात 'लिटिल इंडिया' गेटवेची पायाभरणी केली. मोदींनी 'नमस्ते ऑस्ट्रेलिया' या संबोधनाने भाषणाची सुरुवात केली.
भारत आणि ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक संबंध : नरेंद्र मोदी म्हणाले की, 'एक काळ असा होता की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध 3C (कॉमनवेल्थ, क्रिकेट, करी) वर आधारित होते. त्यानंतर असे म्हटले गेले की भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध 3D (डेमोक्रेसी, डायसपोरा, दोस्ती) वर आधारित आहेत. काही लोकांनी असेही म्हटले की भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध 3E (ऊर्जा, अर्थव्यवस्था, शिक्षण) वर आधारित आहेत. हे वेगवेगळ्या कालखंडात खरे असेल, पण भारत-ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक संबंधांचा विस्तार खूप मोठा आहे. या संबंधांचा आधार परस्पर विश्वास आणि परस्पर आदर आहे.'
'जगातील सर्वात तरुण टॅलेंट फॅक्टरी भारतात आहे' : मोदी पुढे म्हणाले की, 'भारतातील लोकांमध्ये खूप क्षमता आहे. भारताकडे संसाधनांचीही कमतरता नाही. आज जगातील सर्वात मोठी आणि सर्वात तरुण टॅलेंट फॅक्टरी भारतात आहे. गेल्या वर्षी महान क्रिकेटपटू शेन वॉर्नचे निधन झाले, तेव्हा ऑस्ट्रेलियातील लोकांसह करोडो भारतीयांनीही शोक व्यक्त केला. आपल्या सर्वांचे एक स्वप्न आहे की आपला भारत देखील एक विकसित राष्ट्र बनला पाहिजे. जे स्वप्न तुमच्या हृदयात आहे ते माझ्या हृदयात देखील आहे.'
'मोदी बॉस आहेत' : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सिडनी येथे एका सामुदायिक कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे स्वागत केले, ते म्हणाले, 'मागील वेळी मी ब्रूस स्प्रिंगस्टीनला या मंचावर पाहिले होते, मात्र त्यांना देखील मोदींसारखे स्वागत मिळाले नाही. पीएम मोदी हे बॉस आहेत.' ते म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रेलियात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आज पंतप्रधान म्हणून मी माझे पहिले वर्ष साजरे करत आहे. मोदी माझे मित्र असून मी त्यांना आत्तापर्यंत सहा वेळा भेटलो आहे. मात्र आज त्यांच्यासोबत स्टेजवर उभे राहण्यापेक्षा दुसरे सुख काही नाही.
बुधवारी द्विपक्षीय बैठक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची बुधवारी द्विपक्षीय बैठक होणार आहे. ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, मोदी म्हणाले की त्यांना इंडो-पॅसिफिक प्रदेशात संरक्षण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाशी संबंध पुढील स्तरावर नेण्याची इच्छा आहे. ते असेही म्हणाले की इंडो-पॅसिफिक प्रदेशाला हवामान बदल, दहशतवाद, दळणवळणाच्या सागरी मार्गांची सुरक्षा आणि चाचेगिरी यासारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि भारताचा विश्वास आहे की सामायिक प्रयत्नांद्वारेच त्यांचे निराकरण केले जाऊ शकते.
विशेष बसेसचे आयोजन : ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदींचे सिडनीच्या सामुदायिक रिसेप्शनमध्ये जोरदार स्वागत केले. मोदी समर्थकांनी ब्रिस्बेन आणि कॅनबेरा येथून विशेष बसेसचे आयोजन केले आहे. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स 2016 च्या जनगणनेनुसार, ऑस्ट्रेलियातील 619,164 लोकांनी घोषित केले की ते भारतीय वंशाचे आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन लोकसंख्येच्या 2.8 टक्के लोकांचा समावेश आहे. त्यापैकी 592,000 भारतात जन्मलेले आहेत.
हेही वाचा :
- PM Modi Australia Visit : पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर, ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध आणखी दृढ करणार
- PM Modi Meets The Governor General : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली पापुआ न्यू गिनीच्या गव्हर्नर जनरलची भेट
- Papua New Guinea PM : पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान पडले मोदींच्या पाया! प्रोटोकॉल मोडून केले भव्य स्वागत