वॉशिंग्टन : अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती विवेक रामास्वामी हेदेखील स्पर्धेत उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या डिबेटनंतर सध्या सगळीकडे त्यांच्याच नावाची चर्चा आहे.
..तर विवेक रामास्वामी उपाध्यक्ष बनतील : रामास्वामी यांच्यासाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवणं तितकं सोपं नाही. एका सर्वेनुसार, रिपब्लिकन पक्षामध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्यापही अव्वल स्थानी आहेत. त्यामुळे आता रामास्वामी यांनी संकेत दिले आहेत की, २०२४ च्या निवडणुकासाठी पक्षाची उमेदवारी मिळली नाही तर ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संयुक्त तिकीटावर लढण्यास तयार आहेत. याचाच अर्थ असा की, जर ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आले तर विवेक रामास्वामी अमेरिकेचे उपाध्यक्ष होणार आहेत.
अध्यक्षीय चर्चेत कडवी झुंज दिली : रामास्वामी यांनी बुधवारी त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेत भाग घेतला. चर्चेत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर ख्रिस क्रिस्टीज, माजी उपाध्यक्ष माइक पेन्स आणि दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हेली यांच्याशी चांगलीच झुंज दिली. चर्चेनंतर आत्मविश्वासाने सामोरे जाणाऱ्या रामास्वामी यांनी पत्रकारांना सांगितले की, शर्यतीत फक्त दोनच उमेदवार उरले आहेत, ते आणि ट्रम्प. यावर पत्रकाराने विचारले की, तुम्हाला ट्रम्पचे उपाध्यक्ष झाल्यास आनंद होईल का? यावर रामास्वामी यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. 'मला आपल्या देशाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. मी जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये जाईन तेव्हाच या देशाला पुन्हा एकत्र करू शकेन', असं रामास्वामी म्हणाले.