वॉशिंग्टन USA in Support of Israel : इस्रायलवर हमासनं मोठा हल्ला केलाय. हमासच्या हल्ल्याला इस्रायलनं देखील चोख प्रत्यूत्तर दिलंय. त्यामुळं या हल्ल्यात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या सुमारे हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. याशिवाय हजारो नागरिक जखमी झाले आहेत. तसंच 100 हून अधिक लोकांना ओलीस ठेवल्याचा दावाही हमासनं केलाय. हमासनं केलेल्या या हल्ल्यानंतर अनेक देशांनी इस्रायलला मदतीचा हात पुढं केलाय.
अमेरिकेची लढाऊ विमानं अलर्टवर : हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामधून इस्रायलमध्ये तीन हजाराहून अधिक रॉकेट्स डागून हल्ला केला. हमासनं केलेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेनं इस्रायलला मदत करण्याची मोठी घोषणा केलीय. अमेरिकेच्या संरक्षण सचिवानं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केलाय. यानंतर त्यांनी भूमध्य समुद्रात युद्धनौकांचा ताफाही पाठवला आहे. यासह अमेरिकेनं F-35, F-15 आणि F-16 या लढाऊ विमानांनाही अलर्टवर ठेवलंय. हमासच्या या हल्ल्यात चार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्यानं दिलीय.
इस्रायलला अतिरिक्त मदत : हमासनं इस्रायलवर करण्यात आलेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला अतिरिक्त मदत पाठवण्याचे आदेश दिले आहेत, असं व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकात म्हटलंय. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व कमला हॅरिस यांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी इस्रायलमधील परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिल्याचंही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलंय.
युद्ध निर्णायक वळणावर :अमेरिका इस्रायलकडून आलेल्या अतिरिक्त लष्करी मदतीसाठीच्या विनंतीचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं अमेरिकेचे संरक्षणन सचिव अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेच्या युद्धनौका इस्रायलच्या किनाऱ्याच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं एकीकडं इस्रायली लष्कर, हवाई दलाकडून गाझा पट्टीत तुफान बॉम्बफेक केली जात असताना दुसरीकडं भूमध्य सागरातून अमेरिकेच्या युद्धनौका गाझा पट्टीवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेनं इस्रायलला केलेल्या या मदतीमुळं आता हे युद्ध आता निर्णायक वळणावर आल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा :
- Israel Palestine conflict : हमासच्या दहशतवाद्यांनी विवस्त्र करत फिरवलेल्या 'त्या' महिलेची ओळख पटली, जाणून घ्या सविस्तर माहिती
- Israel Hamas Conflict : इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या नेतृत्वाला धोका?
- Israel Hamas Conflict : हमासचा अचानक हल्ला इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश, कसा झाला ५० वर्षांतील सर्वात मोठा हल्ला