नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्यात अनेक महत्वाचे करार केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याचे चांगले फलित मिळाल्याचे दिसून येत आहे. भारत अमेरिका संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये अमेरिका वारी केली होती. त्यांच्या या अमेरिका दौऱ्याचे चांगले फलित मिळाले असून अमेरिकेच्या दुतावासाने तस्करी झालेल्या भारताच्या 105 पुरातन वस्तू भारताच्या दुतावासाकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी अमेरिकेच्या तस्करी विरोधी पथकाचे आणि मॅनहाटनचे जिल्हा वकील अल्विन ब्रॅग यांचे आभार व्यक्त केले.
समृद्ध भारताचा जीवंत वारसा :अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी भारताच्या पुरातन वस्तू अमेरिकन दुतावासाने परत केल्यामुळे अमेरिकन सरकारसह दुतावासाचे आभार व्यक्त केले. भारतातील नागरिकांसाठी या केवळ कलाकृती नसून त्यांच्या जिवंत वारशाचा आणि संस्कृतीचा हा भाग असल्याचे तरनजीत सिंग संधू यांनी स्पष्ट केले. पुरातन वास्तू लवकरच भारतात आणल्या जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या समारंभाला मॅनहॅटन जिल्हा वकील कार्यालय आणि होमलँड सिक्युरिटी तपास पथकातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत भेट दिल्यानंतर भारत आणि अमेरिकेत सांस्कृतिक संपत्ती करारावर काम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सांस्कृतिक कलाकृतींची अवैध तस्करी रोखण्यात मदत होणार आहे.
भारतातील 105 पुरातन वस्तू आहेत अमुल्य :अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांच्या द्विपक्षीय सहकार्याला यामुळे आणखी महत्त्व मिळणार आहे. 105 कलाकृती भारतातील उत्पत्तीच्या दृष्टीने विस्तृत भौगोलिक प्रसाराचे प्रतिनिधित्व करतात. त्यापैकी 47 कलाकृती पूर्व भारतातील, 27 दक्षिण भारतातील, 22 मध्य भारतातील, 6 उत्तर भारतातील आणि 3 पश्चिम भारतातील असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.