न्युयॉर्क :संभाव्य बँकिंग संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नियामकांनी मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेतील टॉप 16 बँकांमध्ये समाविष्ट असलेली सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्यात आली आहे. या घोषणेनंतर जगभरातील शेअर बाजारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. विशेष म्हणजे, सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) स्टार्टअप विशेषतः तांत्रिक स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी ओळखले जाते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आर्थिक संकटाचे चाहुल लागत असताना, अमेरिकन नियामकांनी बँक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठेवीदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी निर्णय : यूएस नियामकाचे म्हणणे आहे की, बँकेत ठेवीदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी SVB चा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएस नियामकाने असेही स्पष्ट केले आहे की, ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी बँकेची $210 अब्ज किमतीची मालमत्ता विकण्याची योजना आहे. नियामकाने यूएस फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) कडे मालमत्ता विकण्याचे काम सोपवले आहे. जे बँकांमधील गुंतवणुकीचा विमा करते. या बँकेचा रिसीव्हर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बँक बंद करण्याची ही पहिली वेळ नाही : FDIC ने सांगितले की, ते 13 रोजी SVB च्या सर्व शाखा उघडतील. विमाधारक गुंतवणूकदार त्या दिवशी त्यांची खाती ऑपरेट करू शकतील. शुक्रवारी यूएस स्टॉक मार्केटमध्ये SVB चे शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले. त्यानंतर अमेरिकन नियामकाने ही कारवाई केली. वृत्त लिहेपर्यंत बँकेकडून याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिकेच्या नियामक संस्थांनी कोणतीही बँक बंद करण्याची ही पहिली वेळ नाही.