वॉशिंग्टन (यूएस): ओडिशात झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे अख्या देश हादरून गेला. या अपघातामुळे भारतासह अनेक देशात शोककळा पसरली आहे. विविध देशातील राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरद्वारे आपला शोक व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तीव्र शोक व्यक्त केला. रेल्वे अपघातानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'व्हाइट हाऊस' येथून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवदेनात ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन म्हणाले की, बालासोर जिल्ह्यातील रेल्वे अपघाताच्या दुःखद बातमीने ते दोघेही दु:खी झाले आहेत," असे एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या तिहेरी रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 1,000 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला शोक : व्हाईट हाऊसच्या अधिकृत निवेदनानुसार, ज्यांनी प्रियजन गमावले आहेत. तसेच या भयंकर दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो,” असे बायडेन म्हणाले आहेत. युनाटेड स्टेट्स आणि भारत हे कौटुंबिक आणि संस्कृतीच्या संबंधांमध्ये घट्ट रुतलेले आहेत. जे आपल्या दोन राष्ट्रांना पुन्हा जोडतात. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेतील नागरीक भारतातील लोकांच्या दु:खात सहभागी होतात. परिस्थिती पूर्ववत होईतोवर आम्ही भारतीयांच्या सोबत आहोत,असे निवेदनात म्हटले आहे.
युद्ध पातळीवर रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू : रेले रुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. या कामासाठी 1 हजार पेक्षा जास्त कामगार रेल्वे रुळ दुरुस्तीचे आणि रेल्वे डब्ब्यांचे अवशेष दूर करण्याचे काम करत आहेत. भारतीय रेल्वेने याप्रकरणी ट्विट करत कामाची माहिती दिली आहे. रेलेरुळाच्या दुरुस्तीचे काम आणि रेल्वेचे अवशेष दूर करण्यासाठी 7 पेक्षा जास्त पोक्लेन्स, 5 जेसीबी, दोन अपघात बचाव रेल्वे आणि मोठे क्रेन कामाला लागले आहेत. या भीषण रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 1 हजार प्रवाशी लोक जखमी झाले आहेत. एकूण 1 हजार 175 जखमींना विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 793 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या रेल्वेतून तब्बल 2 हजार प्रवासी प्रवास करत होते.
जपानचे पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक : रेल्वे अपघातानंतर जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोकसंदेश पाठवला आहे. किशिदा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “ओडिशातील रेल्वे अपघातात अनेक लोकांचा मृत्यू आणि जखमी झाल्याच्या वृत्ताने मला खूप दुःख झाले आहे. जपान सरकार आणि तिथल्या लोकांच्या वतीने, ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी यांनीही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना या अपघाताबद्दल शोकसंदेश पाठवला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो :कॅनडाचे पंतप्रधान यांनीही शोक व्यक्त केला आहे. कॅनडाचे लोक या कठीण काळात भारतीय लोकांच्या पाठीशी उभे आहेत.