वॉशिंग्टन : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकन न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे. अमेरिकन न्यायालयाने तहव्वूर राणाची भारताकडे प्रत्यापर्णाच्या विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तहव्वूर राणाला भारताच्या हवाली करण्यासाठी अमेरिकन न्यायालयाने मे महिन्यात मान्यता दिली आहे. तहव्वूर राणा हा मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील आरोपी आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाची याचिका फेटाळून लावल्याने अमेरिकन परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणं सोप्पं झालं आहे.
पाकिस्तानी वंशाचा कॅनेडीयन नागरिक : तहव्वूर राणा हा मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील आरोपी असून तो पाकिस्तानी वंशाचा कॅनेडीयन नागरिक आहे. तहव्वूर राणा हा कॅनडात व्यापर करत होता. मात्र मुंबईवर हल्ला झाल्यानंतर तहव्वूर राणा याचा या हल्ल्यात सहभाग असल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे भारतानं अमेरिकेकडं त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
तहव्वूर राणा नजरकैदेत :अमेरिकेच्या न्यायालयाने 62 वर्षीय राणाच्या प्रत्यार्पणाला मे महिन्यात मान्यता दिली. तहव्वूर राणा हा लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये नजरकैदेत आहे. तहव्वूर राणानं 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या अमेरिकन सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यावर सध्या अमेरिकेतील न्यायालयात सुनावणी सुरू आहे.