कीव : युक्रेनची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. कीवच्या बाहेर ब्रोव्हरी टाऊनमध्ये बुधवारी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी एका निवासी इमारतीजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती कीव प्रदेशाच्या राज्यपालांनी दिली. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपघातात गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांचा मृत्यू :या अपघातावर रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अपघाताचे कारण शोधले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय पोलीस प्रमुख इहोर क्लेमेन्को यांनी माहिती दिली की या अपघातात गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाचे उपप्रमुख किरिलो टायमोशेन्को यांनी टेलीग्रामवर लिहिले की, आम्ही जीवितहानी आणि परिस्थितीबद्दल माहिती मिळवत आहोत.
10 मुलांसह एकूण 22 जण जखमी :हेलिकॉप्टर अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक ओरडताना दिसत आहेत. कीवच्या पूर्वेकडील उपनगरातील ब्रोव्हरी येथे अपघात झालेल्या आपत्कालीन सेवेच्या हेलिकॉप्टरमध्ये मृत लोक होते. या अपघातात 10 मुलांसह एकूण 22 जण जखमी झाले आहेत. अधिकारी आणि स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की हेलिकॉप्टर बालवाडीजवळ क्रॅश झाले.