अंकारा : तुर्की आणि सीरियात आलेल्या भीषण भूकंपामुळे शुक्रवारी मृतांची संख्या 41 हजारांहून अधिक झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी आपत्तीग्रस्त देशांसाठी मानवतावादी मदत म्हणून 100 कोटी रुपये देण्याचे आवाहन केले आहे. तुर्कीमध्ये भूकंपाचे किरकोळ धक्के अजूनही जाणवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 12 तासांत 4 वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी घबराट पसरली आहे.
मदत व बचाव कार्य अजूनही चालू : 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियाच्या काही भागात आलेल्या भूकंपाने हाहाकार माजवला आहे. येथे अजूनही मोठ्या प्रमाणावर मदत-बचाव कार्ये सुरू आहेत. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की बचाव पथक अद्यापही अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. तुर्कीतील हजारो इमारती पत्त्याच्या घरासारख्या कोसळल्या आहेत. या ढिगाऱ्यांच्या तळापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरत आहे.
ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले : तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. डझनभर देशांतील बचाव पथके युद्धपातळीवर मदत व बचाव कार्यात गुंतलेली आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेकांची सुटका अद्यापही सुरू आहे. भूकंप होऊन अकरा दिवस उलटल्या नंतरही लोकांना जिवंत वाचवण्यात यश मिळते आले. एक 17 वर्षीय मुलगी आणि 20 वर्षीय महिलेला मदत बचाव पथकाने जिवंत बाहेर काढले आहे.