अंकारा : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा अजूनही वाढतो आहे. कोसळलेल्या इमारतींमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम अविरत सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये अजूनही मदत व बचाव कार्य सुरू आहे. आता ढिगाऱ्याखाली कोणीही जिवंत असण्याची आशा तशी कमी आहे. मदत पथके मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर लाखो बेघर लोकांना मदत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.
तुर्कीमध्ये 44 हजार लोकांचा मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामधील मृतांची संख्या 50,000 हून अधिक झाली आहे. भूकंपात 1,60,000 हून अधिक इमारती कोसळल्या आहेत तसेच अनेक इमारतींचे गंभीर नुकसान झाले आहे. या भूकंपात सुमारे 5,20,000 अपार्टमेंट उद्ध्वस्त झाल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आधीच सुमारे 50 हजार लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली होती. केवळ तुर्कीमध्ये 44 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण (AFAD) ने शुक्रवारी रात्री सांगितले की, भूकंपामुळे तुर्कीमध्ये मृतांची संख्या 44,218 वर पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार सीरियामध्ये 5,914 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह दोन्ही देशांतील एकत्रित मृत्यूची संख्या 50,000 च्या पुढे गेली आहे.