तुर्की : दक्षिण तुर्कीमध्ये पुन्हा एकदा दोन मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर यांची तीव्रता 6.4 आणि 5.8 इतकी मोजली गेली. तुर्कीमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. भूकंपात किमान 3 लोकांचा मृत्यू झाला असून 213 जण जखमी झाले आहेत.
तीन मिनिटांच्या अंतरावर दोन भूकंप : मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कीच्या दक्षिणी हते प्रांतात स्थानिक वेळेनुसार 20.04 वाजता भूकंप झाला. याची तीव्रता 6.4 होती. तीन मिनिटांनंतर दुसरा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.8 एवढी मोजली गेली. तुर्कीमध्ये तीन ठिकाणी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पहिला भूकंप 16.7 किमी (10.4 मैल) खोलीवर आला, तर दुसरा 7 किमी (4.3 मैल) खोलीवर होता. दोन्ही भूकंपाचे पडसाद आजूबाजूच्या परिसरात उमटले आहेत.
मदत आणि बचाव कार्य सुरु : दोन आठवड्यांपूर्वी 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपात आत्तापर्यंत 44 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हातेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या कहानमारसमध्ये हा भूकंप झाला होता. तुर्की अजुनही मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. अद्यापही मदत आणि बचाव पथक अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. विविध देशांचे मदत आणि बचाव पथक युद्धपातळीवर बचाव कार्यात गुंतले आहेत.