तेल अवीवIsrael Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात आजपासून चार दिवसांचा युद्धविराम सुरू होणार आहे. यादरम्यान ओलीस तसंच पॅलेस्टाईनच्या कैद्यांना आज सोडण्यात येणार आहे. कतारनं गुरुवारी ही घोषणा केलीय. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी यासंदर्भात एक निवेदनही जारी केलंय. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजता युद्धविराम सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर 13 महिला आणि मुलांना दुपारी 4 वाजता सोडण्यात येणार आहे. अल-अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोडण्यात येणार्या कैद्यांची यादी इस्रायलची गुप्तचर सेवा मोसादकडे पाठवण्यात आलीय.
कतारचे प्रवक्ते काय म्हणाले : कतारच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, मोसाद कतारला ज्यांची सुटका होण्याची शक्यता आहे त्या पॅलेस्टाईन कैद्यांची यादी देईल. या अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की, दोन्ही यादींची पुष्टी झाल्यानंतर लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सुटकेची प्रक्रिया सुरु झाल्यावर, कैद्यांना हैफा, डॅमन आणि मेगिड्डोच्या आग्नेयेकडील दोन तुरुंगांमधून, व्याप्त वेस्ट बँकमधील रामल्लाहच्या दक्षिणेकडील ओफर तुरुंगात स्थालांतरित केलं जाईल. तिथं रेडक्रॉस सदस्य त्यांची शारीरिक तपासणी करतील. याआधी बुधवारी, एका इस्रायली अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता युद्धविराम सुरू होईल, त्यानंतर गाझामध्ये बंदिवान असलेल्या 230 हून अधिक लोकांमध्ये किमान 50 महिला आणि मुलांना सोडण्यात येईल. तथापि, युद्धविराम सुरू होण्याच्या काही तास आधी, बुधवारी रात्री उशिरा त्या तयारीला स्थगिती देण्यात आली होती.