काटमांडू ( नेपाळ ) - नेपाळच्या तारा एअरलाइन्सच्या विमान 9 NAET चा ATC शी संपर्क तुटला. दोन इंजिन असलेले विमान असून यात तीन क्रू सदस्यांसह एकूण 22 जण विमानात आहेत. त्यापैकी चार भारतीय नागरिक आहेत, अशी माहिती त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रमुखांनी दिली. सकाळपासून बेपत्ता असलेले हे विमान तब्बल सहा तासांहून अधिक काळानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मस्टँग परिसरात क्रॅश झाले आहे.
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच लेयते पास परिसरात शेवटचा संपर्क झाला. तसेच जोमसोमच्या घासा परिसरात मोठा आवाज झाल्याची पुष्टीही अधिकाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाची दखल घेत गृह मंत्रालयाने मस्टँग आणि पोखरा येथून दोन खासगी हेलिकॉप्टर शोधासाठी तैनात केले आहेत. तसेच बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारीही सुरू आहे, असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्र मणी पोखरेल यांनी सांगितले.
लष्करी हेलिकॉप्टर रवाना - नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले, नेपाळी सैन्याचे एमआय-17 हेलिकॉप्टर ले-पास आणि मस्टँगसाठी रवाना झाले आहे. तारा एअरलाइन्सच्या बेपत्ता विमानाचा या परिसरात क्रॅश शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेपाळी मीडियानुसार, विमानातील सर्व प्रवासी नेपाळमधील प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिराच्या यात्रेसाठी निघाले होते. पोलीस अधिकारी रमेश थापा यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत आहे. पण, सर्व उड्डाणे सुरळीत सुरू आहेत. दरीत उतरण्यापूर्वी विमाने पर्वतांच्या मधून उडतात.