कोलंबो:श्रीलंकेची संसद ( Sri Lankan Parliament ) 20 जुलै रोजी नवीन अध्यक्षाची निवड करणार आहे. नवीन राष्ट्रपती हे गोटाबाया राजपक्षे यांच्यानंतर नियुक्त होतील. संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सोमवारी ही घोषणा ( Lankan elect new President next week ) केली. आज सर्वपक्षीय नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. मात्र, 13 जुलै रोजी पद सोडणार असल्याचे त्यांनी शनिवारी सभापतींना कळवले होते. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही नवीन सरकार स्थापन झाल्यावर तेही पद सोडणार असल्याचे सांगितले आहे.
२० जुलै रोजी मतदान :अभयवर्धने म्हणाले की, राजपक्षे यांचा राजीनामा बुधवारी प्राप्त झाल्यानंतर, रिक्त पदाची घोषणा करण्यासाठी 15 जुलै रोजी संसदेची बैठक बोलावण्यात येईल आणि नामांकन स्वीकारण्यासाठी पुन्हा 19 जुलै रोजी बैठक बोलावली जाईल. ते म्हणाले की, नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी 20 जुलै रोजी संसदीय मतदान होणार आहे. राजपक्षे यांनी सार्वजनिक उठावानंतर पक्षाच्या नेत्यांनी राजीनामा देण्याची विनंती स्वीकारून शनिवारी पायउतार होण्याचे मान्य केले आहे.