महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

"भारताच्या हिताचा प्रश्न असेल तर मोदींना घाबरवता किंवा धमकावता येत नाही", पुतिन यांची स्तुतिसुमनं

Putin On Modi : रशियन नेत्यांनी या आधी भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अनेकदा कौतुक केलं आहे. आता १४व्या व्हीटीबी इन्व्हेस्टमेंट फोरम मध्ये बोलताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.

Putin On Modi
Putin On Modi

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 5:17 PM IST

मॉस्को Putin On Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. मोदींना घाबरवलं जाऊ शकत नाही किंवा राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही, असं ते म्हणाले. राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण करताना पंतप्रधान मोदी कठोर भूमिका घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मी कल्पना करू शकत नाही की मोदींना धमकावलं जाऊ शकतं किंवा कोणताही निर्णय घेण्यास भाग पाडलं जाऊ शकतं, असं पुतिन म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर जबरदस्ती करता येत नाही : विशेषत: जेव्हा एखादा निर्णय भारताच्या आणि भारतीय लोकांच्या हिताच्या विरोधात असेल, तेव्हा पंतप्रधान मोदींना जबरदस्ती करता येत नाही, असं त्यांनी सांगितलं. मी याविषयी कधीच बोललो नाही. मी हे फक्त बाहेरून पाहतो. खरं सांगायचं तर, भारताच्या हिताचं रक्षण करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या कठोर भूमिकेचं मला कधी कधी आश्चर्य वाटतं, असं पुतिन म्हणाले.

व्दिपक्षीय संबंध वेगानं विकसित होत आहेत : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन १४व्या व्हीटीबी इन्व्हेस्टमेंट फोरम 'रशिया कॉलिंग'ला संबोधित करत होते. भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर प्रकाश टाकताना, दोन्ही देशांमधील संबंध सर्व बाजूंनी उत्तम गतीनं विकसित होत असल्याचं पुतिन यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींची धोरणं दोन्ही देशांमधील संबंधांची मुख्य हमी आहे, असं ते म्हणाले. यावेळी पुतिन द्विपक्षीय व्यापाराच्या विस्ताराला गती देण्यासाठी दोन्ही देशांकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दलही बोलले.

दोन देशांमधील व्यापार वाढला : भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार उलाढाल वाढत असल्याचं पुतिन यांनी सांगितलं. गेल्या वर्षी ते ३५ अब्ज डॉलर प्रति वर्ष होतं. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ते ३३.५ अब्ज डॉलरवर पोहोचलं आहे, असं ते म्हणाले. रशियन ऊर्जा संसाधनावरील सवलतीमुळे भारताला अधिक फायदा होत आहे. मी त्यांच्या जागी असतो आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली असती तर मीही तेच केलं असतं, असं पुतिन यांनी आवर्जून सांगितलं.

हेही वाचा :

  1. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या साथीदाराचा पाकिस्तानमध्ये खात्मा
  2. अफगाणिस्तानचा भारतातील दूतावास कायमस्वरूपी बंद, निवेदन जारी करून 'ही' माहिती दिली

ABOUT THE AUTHOR

...view details