मॉस्को: वॅगनर फायटरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचे बंड शमविण्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना यश मिळाले आहे. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मध्यस्थीने केलेल्या करारानुसार मॉस्कोकडे जाणारे प्रीगोझिन यांचे सैन्य थांबणार आहे. करारानुसार वॅगनर नेत्यावरील सर्व आरोप वगळण्यात आल्याचे क्रेमलिनच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले. रशियन सैन्याविरुद्ध सशस्त्र बंड पुकारल्याने प्रिगोझिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. माध्यमातील वृत्तानुसार देशाच्या लष्करी नेतृत्वाविरुद्ध प्रिगोझिन यांनी बंडखोरी थांबविली आहे.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री एस. पेस्कोव्हच्या यांनी म्हटले, की उठावात भाग न घेणारे वॅगनरचे सैनिक रशियन संरक्षण मंत्रालयाशी करार करू शकतात. बंडात भाग घेतलेल्या लढवय्यांविरुद्ध कोणताही खटला चालणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले. बेलारशियन अध्यक्षांनी देशातील ताण-तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केले. बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले की रात्री 9 वाजता राष्ट्रपतींनी पुन्हा फोनवर चर्चा केली. बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांनी रशियाच्या अध्यक्षांना वॅग्नर ग्रुपच्या नेत्याशी झालेल्या चर्चेतील निर्णयाची माहिती दिली . या कराराबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बेलारशियन अध्यक्षांचे आभार मानले.