लंडन Rajnath Singh On China : भारत आता जागतिक पातळीवर स्ट्रॅटेजिक पॉवर म्हणून उदयाला आलेला देश आहे. त्यामुळं आमच्याकडं कोणी डोळे वटारुन पाहू शकत नाही, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते लंडन इथं बुधवारी इंडिया हाऊसमध्ये नागरिकांना संबोधित करत होते. भारताच्या बदलत्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांमुळं जगाचा भारताकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. चीनच्या मुखपत्रात छापून आलेल्या एका लेखाचा हवाला देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लंडनमध्ये हे भाष्य केलं आहे.
भारताकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही :चीनच्या मुखपत्रात भारताबद्दल एक लेख छापून आला आहे. त्यामुळं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी "चीनला आता भारताची दखल घ्यावी लागत आहे. चीनचा भारताकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचं यावरुन दिसत आहे. भारताच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांमुळं जगात भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. आमच्या बदलत्या धोरणात्मक हितसंबंधामुळं जागतिक स्तरावर भारतानं ठसा उमटवला आहे. आम्ही कोणालाही आमचा शत्रू मानत नाही. भारत आणि चीनचे संबंध तणावपूर्ण आहेत. मात्र भारताकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही, हे शेजारी देशांना कळलं आहे. मात्र तरी, आम्ही शेजारी आणि जगभरातील देशांशी चांगले संबंध जोपासू इच्छितो" असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भारतीय सैन्यानं चीन सैन्याला धैर्य दाखवलं :"या लेखात लेखकानं भारताची बदलती प्रतिमा आवडो की न आवडो, मात्र त्याकडं दुर्लक्षित करता येणार नाही. पूर्वी जेव्हा व्यापारी असमतोलावर चर्चा केली जात होती, तेव्हा भारत बिजिंगवर विश्वास ठेवायचा. मात्र आता तो ट्रेंड प्रचलित नाही. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झडप झाली. तेव्हा भारतीय सैन्यानं चीनच्या सैन्याला धैर्य दाखवलं. त्यामुळंही बिजिंगचा भारताकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत झाली" असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आमच्याकडं आता कोणी डोळे वटारुन पाहू शकत नाही :"जगाच्या नजरेत आता आपण कमकुवत देश राहिलो नाही. भारत आता जागतिक पातळीवर वाढती महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. दिल्लीतील विचारसरणी आता विकसित झाली आहे. भारत शक्तीशाली देश होण्याकडं वाटचाल करत आहे. त्यामुळं आमच्याकडं आता कोणी डोळे वटारुन पाहू शकत नाही" असा इशाराच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची लंडनमध्ये भेट घेतली. यावेळी राजनाथ सिंह यांच्या समवेत संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ( DRDO ) आणि संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ होतं.
हेही वाचा :
- Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी भारत-चीन सीमेवर केलं शस्त्रपूजन, जवानांशीही साधला संवाद
- नवीन विचार आणि नवीन कल्पनांबद्दल मोकळेपणा गमावू नका - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजघाटाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याचे केले अनावरण