न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग कार्यक्रमाचे नेतृत्व केले. या कार्यक्रमात 180 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित लोकांना संबोधित देखील केले. या योगदिनी एक विक्रम झाला आहे. पंतप्रधान मोदी नेतृत्व करत असलेल्या या योगा सत्राची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी मोदींनी 9 व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या स्मरणार्थ तेथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात ऐतिहासिक योगा कार्यक्रमाचे नेतृत्त्व केले. या योगाच्या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्राचे सर्वोच्च अधिकारी, आणि प्रमुख व्यक्ती उपस्थित होते शिवाय त्यांनी योगाही केला.
कसा झाला रेकॉर्ड :संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली योगाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी योगासने करण्यासाठी अनेक राष्ट्रीयत्वाच्या लोकांनी सहभाग घेतला होता. यामुळे त्यांच्या सहभागामुळे या योगा कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीच्या 77 व्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी, डेप्युटी सेक्रेटरी-जनरल अमिना मोहम्मद आणि न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनीही मोदींसोबत योगाभ्यास केला. योगा करताना पंतप्रधान मोदींनी ढगळा पांढरा टी-शर्ट आणि पायघोळ पायजामा परिधान केला होता. यावेळी मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. योगासन करण्यासाठी सहभाग घेतला म्हणून त्यांनी उपस्थित लोकांचे आभार देखील मानले.