नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश पाकिस्तान दीर्घ काळापासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे. पाकिस्तानची स्थिती श्रीलंकेसारखी होत आहे. तो जवळपास दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. आर्थिक संकट आणि दहशतवादाशी झुंजणाऱ्या पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. इम्रान खान आणि शहबाज शरीफ एकमेकांवर लष्करशाहीचे आरोप करत आहेत. दुसरीकडे, नुकत्याच आलेल्या पुरामुळे बाधित क्षेत्र जवळपास दोन दशके मागे ढकलले गेले आहेत. या आव्हानांच्या पलीकडे पाकिस्तानमध्ये सध्या आशेचा काही किरण असेल तर तो म्हणजे फक्त परदेशातून मिळणारी मदत!
पाकिस्तानची आर्थिक स्थिती :पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा आता कोणापासून लपून राहिलेली नाही. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा परकीय चलन साठा जानेवारी 2022 मध्ये $16.6 अब्ज होता. आता तो $5.576 अब्ज इतका कमी झाला आहे. विश्लेषकांच्या मते, सध्याच्या परकीय चलनाच्या साठ्यानुसार पाकिस्तान केवळ तीन आठवड्यांसाठीच आयात करू शकेल. याशिवाय पाकिस्तानी चलनही डॉलरच्या तुलनेत खूपच कमकुवत झाले आहे. एका डॉलरची किंमत 227.8 पाकिस्तानी रुपया इतकी झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 10 रुपयांनी घसरले आहे. अन्नधान्य महागाई दर प्रत्येक वर्षी 35.5 टक्क्यांनी वाढला आहे. तर डिसेंबरमध्ये पाकिस्तानमधील वाहतूक दर 41.2 टक्क्यांनी वाढले आहेत.
हेनले पासपोर्ट इंडेक्स : हेनले पासपोर्ट इंडेक्सने जारी केलेल्या नवीन रँकिंगनुसार, पाकिस्तानी पासपोर्ट हा जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट आहे. 2022 च्या क्रमवारीत पाकिस्तानच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी देखील पाकिस्तानी पासपोर्ट हा जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट होता. या वर्षी पाकिस्तानचे रँकिंग 106 आहे. नव्या क्रमवारीत पाकिस्तानच्या खाली सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान आहेत. पाकिस्तानी पासपोर्ट धारक व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हलद्वारे 32 देशांमध्ये प्रवास करू शकतात.
उपासमारीचा धोका : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पाकिस्तानला उपासमारीचा मोठा धोका आहे. नैसर्गिक आपत्ती आणि विस्कळीत होणारा पुरवठा यामुळे हा धोका आणखी वाढू शकतो, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. जिओ न्यूजच्या अहवालानुसार, हवामान-संबंधित नैसर्गिक आपत्ती आणि पाकिस्तानचा विस्कळीत होणारा पुरवठा यामुळे लाखो लोकांच्या उपासमारीचे सध्याचे संकट आपत्तीजनक परिस्थितीत येऊ शकते. रुपयाचे घसरलेले मूल्य आणि वाढती महागाई यामुळे उपासमारीचा धोका आणखी वाढला आहे.