ओटावा PM Trudeau Allegation On India : कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा खून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हरदीप सिंह निज्जरच्या खुनानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले होते. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंधावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. आता पुन्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या ( Khalistani Terrorist ) हत्येबाबतचे आरोप अनेक आठवड्या अगोदरच भारताकडं करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा वाद रंगणार असल्याचं दिसत आहे.
काय म्हणाले पंतप्रधान जस्टीन ट्रूडो :कुख्यात खलिस्तानवादी हरदीप सिंह निज्जर याची हत्या घडल्यानंतर जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप केला होता. जस्टिन ट्रूडो यांच्या या आरोपानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडीयन नागरिकांनी जम्मू काश्मीरचा प्रवास टाळावा असं आवाहन त्यांनी केलं होतं. शुक्रवारीही जस्टिन ट्रूडो यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना भारताबाबत केलेल्या आरोपाबाबत माध्यमांनी विचारलं असता, त्यांनी यावर पुन्हा भाष्य केलं. भारताला काही आठवड्यापूर्वीच याबाबतचे आरोप करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिली. भारताकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.