हिरोशिमा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी G7 शिखर परिषदेत शाश्वततेचा संदेश देण्यासाठी रिसायकल केलेल्या साहित्यापासून बनवलेले जॅकेट परिधान केले. वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे रिसायकल करून हे जॅकेट तयार करण्यात आले आहे. हे जॅकेट घालून पीएम मोदींनी पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला.
मोदींच्या जॅकेटची जगभरात चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या परदेश दौऱ्यात भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यावर भर दिला. मोदींच्या या जॅकेटची जगभरात चर्चा होत आहे. तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्लीव्हलेस स्काय - ब्लू जॅकेट परिधान केले होते. मोदींना 6 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे आयोजित भारतीय ऊर्जा सप्ताहादरम्यान इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने भेट दिलेले नेहरू जॅकेट देखील रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवले होते.
रशिया-युक्रेन संघर्षावर काय म्हणाले मोदी? : पंतप्रधान मोदी यांनी रविवारी जपानच्या हिरोशिमा शहरात आयोजित G7 शिखर परिषदेच्या सत्रात सध्या सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन संघर्षावरही आपले मत मांडले.
युक्रेनमधील सध्याची परिस्थिती हा राजकारणाचा किंवा अर्थव्यवस्थेचा मुद्दा नाही, तर तो मानवता आणि मानवी मूल्यांचा मुद्दा आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच हा संघर्ष सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. सर्व देशांनी संयुक्त राष्ट्रांची सनद, आंतरराष्ट्रीय कायदा आणि एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. - नरेंद्र मोदी
मोदींनी गौतम बुद्धांचे स्मरण केले : त्यांनी सध्याची स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहनही केले. युक्रेनमधील रशियाचे युद्ध आणि पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची ही टिप्पणी आली आहे. मोदींनी यावेळी गौतम बुद्धांचेही स्मरण केले. ते म्हणाले की, आधुनिक युगात अशी कोणतीही समस्या नाही, ज्याचे समाधान गौतम बुद्धांच्या शिकवणीत सापडत नाही.
युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांशी चर्चा केली : आपल्या भाषणात पंतप्रधानांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, आज आपण राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना ऐकले. काल मी त्यांना भेटलो होतो. मी सध्याच्या परिस्थितीला राजकारण किंवा अर्थव्यवस्थेचा मुद्दा मानत नाही. माझा विश्वास आहे की हा मानवतेचा, मानवी मूल्यांचा मुद्दा आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच तोडगा निघतो, असे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहोत, असे मोदी म्हणाले. या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी, आम्ही शक्य तितके प्रयत्न करू, असे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
- PM Modi Meet Zelenskyy : पंतप्रधान मोदींनी जपानमध्ये घेतली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट
- हवाई दलातील लढाऊ मिग-21 विमान नाही दिसणार लढाईच्या रिंगणात, जाणून घ्या कारण
- Karnataka 5 Guarantees : सिद्धरामय्यांनी करून दाखवले! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दिली पाच हमीपत्रांना मंजुरी