टोकियो : G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जपानच्या हिरोशिमा शहरात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया - युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच वैयक्तिक भेट आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन तसेच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी अनेकदा बोलले आहेत.
अजित डोवाल देखील बैठकीला उपस्थित : पंतप्रधान मोदी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून ग्रुप ऑफ सेव्हन (G7) शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जपानमध्ये गेले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने या बैठकीची छायाचित्रे शेअर केली आहेत. बैठकीला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी 19 मे ते 21 मे या कालावधीत G7 शिखर परिषदेसाठी हिरोशिमा येथे असतील. यावेळी अन्न, खत आणि ऊर्जा सुरक्षा यासह जागतिक आव्हानांवर ते बोलतील अशी अपेक्षा आहे. जपान हा जी 7 राष्ट्रांचा विद्यमान अध्यक्ष आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जपानच्या निमंत्रणावरून शिखर परिषदेत सहभागी होत आहेत.
भारताकडून शांततेसाठी प्रयत्न : भारताने रशिया युक्रेन संघर्षावर राजकीय मुत्सद्देगिरीने मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका करत 'सध्याचे युग हे युद्धाचे युग नाही', असे म्हटले होते. 4 ऑक्टोबर रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कोणत्याही समस्येवर युद्ध हा उपाय असू शकत नाही. भारत कोणत्याही शांतता प्रयत्नांमध्ये आपले योगदान देण्यास तयार आहे. हे संकट मुत्सद्देगिरी आणि संवादानेच सोडवले पाहिजे, असे भारताचे म्हणणे आहे.
झेलेन्स्कींंचे जगभरातून समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न : जपानमध्ये आगमन झाल्यावर राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट केले. ते म्हणाले की, युक्रेनच्या भागीदार आणि मित्रांसोबत महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. या भेटींमुळे शांतता पुन्हा प्रस्थापित होण्यास मदत होईल. शुक्रवारी झेलेन्स्की यांनी सौदी अरेबियामध्ये अरब लीगच्या शिखर परिषदेला अचानक भेट दिली होती. ते रशियावरील निर्बंध आणखी वाढवण्यासाठी आणि युक्रेनला जगभरातून समर्थन मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा :
- MEA Slams US Report : धार्मिक हिंसाचारावरुन अमेरिकेच्या अहवालात भारतावर टीका, भारताने फेटाळला पक्षपाती अहवाल
- Pm Narendra Modi Leaves For Japan : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 7 शिखर परिषदेसाठी सहा दिवसाच्या विदेश दौऱ्यावर रवाना
- Imran Khan Bail : इम्रान खान यांना मोठा दिलासा, सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर