दुबई : फ्रान्सचा दोन दिवसीय दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाले आहेत. तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जगातील सर्वात उंच इमारत 'बुर्ज खलिफा' तिरंग्याच्या रंगांनी उजळली होती. पंतप्रधान मोदी युएईमध्ये येण्यापूर्वी शुक्रवारी बुर्ज येथे लाइट-अँड-साउंड शो सादर करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदींचा फोटो प्रदर्शित करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
मोदींनी अबुधाबीच्या क्राउन प्रिन्सची भेट घेतली : पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते अबुधाबीला पोहोचले. पंतप्रधानांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईमध्ये जोरदार स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मोदींनी ट्विट केले की, 'आज विमानतळावर माझे स्वागत केल्याबद्दल क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचा आभारी आहे'. पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीला पोहोचण्याच्या काही तास आधी संयुक्त अरब अमिरातीने म्हटले की, भारतासोबतची आर्थिक भागीदारी दोन्ही देशांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या यूएई दौऱ्यात ऊर्जा, अन्न सुरक्षा आणि संरक्षण इत्यादी विषयांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देश अनेक ऐतिहासिक व्यापार करारांवर स्वाक्षऱ्या करणार आहेत. तसेच ते दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत. यावेळी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
युएई-भारत व्यापक आर्थिक भागीदारी करार : युएई-भारताचा गैर-तेल व्यापार 2030 पर्यंत प्रतिवर्ष 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे युएईचे विदेश व्यापार राज्यमंत्री डॉ. थानी बिन अहमद अल झेउदी यांनी एका मुलाखतीत सांगितले. थानी बिन अहमद अल झेउदी म्हणाले की, युएई - भारत व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) हा विकास आणि संधीचे नवीन युग प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- PM Modi in UAE : पंतप्रधान मोदींचा यूएई दौरा; द्विपक्षीय संबंधांचा घेणार आढावा
- Narendra Modi France : 'आत्मनिर्भर भारत' साठी फ्रान्स महत्त्वपूर्ण भागीदार - पंतप्रधान मोदी
- Pm Modi Conferred Frances Highest Award : पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान; इमॅन्युएल मॅक्रॉनने नरेंद्र मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने केले सन्मानित