पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करण्यापूर्वी पॅरिसमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, 'दोन्ही देश मागील 25 वर्षांच्या मजबूत पायाच्या आधारावर पुढील 25 वर्षांसाठी रोडमॅप बनवत आहेत'.
'फ्रान्स नैसर्गिक भागीदार' : पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'आम्ही आमच्या धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षे साजरी करत आहोत. भारतातील लोकांनी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. या प्रवासात आम्ही फ्रान्सला नैसर्गिक भागीदार म्हणून पाहतो', असे ते म्हणाले. आदल्या दिवशी, पंतप्रधान मोदींनी फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस चॅनेलच्या ग्लोबल सीईओ लीना नायर, योग अभ्यासक शार्लोट चोपिन आणि एरोस्पेस अभियंता व पायलट थॉमस पेस्केट यांच्यासह प्रख्यात विचारवंतांशी संवाद साधला.
फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभाग : पॅरिसमध्ये बॅस्टिल डे समारंभानंतर फ्रेंच नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष याएल ब्रॉन-पिव्हेट यांनी आयोजित केलेल्या दुपारच्या जेवणाला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. शिवाय, फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत सामील झाले होते. बॅस्टिल डे परेडमध्ये भारताच्या तिरंगी सेवांच्या तुकडीने भाग घेतला होता. तर भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी फ्रेंच जेट्स सह फ्लाय-पास्ट केले. मॅक्रॉन यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्याची आशा व्यक्त केली. मोदी ट्विट करत म्हणाले की, 1.4 अब्ज भारतीय फ्रान्सचे एक मजबूत आणि विश्वासू भागीदार असल्याबद्दल नेहमीच ऋणी राहतील. आपले बंध अजून घट्ट होवोत!'
मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान प्रदान : पंतप्रधान मोदी गुरुवारी पॅरिसमध्ये पोहोचले. ऑर्ली विमानतळावर फ्रान्सच्या पंतप्रधानांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. पॅरिसमध्ये त्यांनी फ्रेंच पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न तसेच फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मॅक्रॉन यांच्यासोबत एका खाजगी डिनरला हजेरी लावली, जिथे पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.
हेही वाचा :
- Pm Modi Conferred Frances Highest Award : पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान; इमॅन्युएल मॅक्रॉनने नरेंद्र मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने केले सन्मानित
- Narendra Modi France Visit : काळ्या वादळात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे डगमगले नाहीत, ही मैत्री निर्णायक वळणावर