नवी दिल्ली :२०th ASEAN Indian Summit : इंडोनेशियातील जकार्ता येथे 20 व्या 'आसियान-भारत' शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. इंडोनेशिया आणि आमची (भारत) भागीदारी चौथ्या दशकात पोहोचली आहे. या शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल मी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचं अभिनंदन करतो. गेल्या वर्षी आम्ही भारत-आसियान मैत्री दिन साजरा केला होता. आता त्याचं रूपांतर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांचं भव्य स्वागत - पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 व्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गुरुवारी सकाळी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पोहोचले. रिट्झ कार्लटन हॉटेलबाहेर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी विमानतळावर तसेच हॉटेलबाहेर भारतीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच जमलेल्या भारतीयांनी 'वंदे मातरम' आणि 'मोदी-मोदी'च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीयांना अभिवादन करत त्यांच्यासोबत संवाद साधला.