अबुधाबी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते शनिवारी यूएईमध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान ते यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेते वाढत्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत. पॅरिसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर मोदी अबुधाबीला पोहोचले आहेत. दुबईच्या बुर्ज खलिफाने शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या अधिकृत भेटीपूर्वी भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग प्रदर्शित केले होते.
द्विपक्षीय चर्चा - पंतप्रधान मोदी UAE चे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक शेख अल नाहयान यांच्याशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी म्हणाले, मी माझे मित्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांना भेटण्यास उत्सुक आहे. हे दोन देश व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, अन्न सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, फिनटेक, संरक्षण आणि सुरक्षा यासारख्या विस्तृत क्षेत्रांमुळे जोडलेले आहेत. त्यामुळे अशा अनेक विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
विविध करारांवर स्वाक्षरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यूएई दौऱ्यात ऊर्जा, अन्न सुरक्षा आणि संरक्षण याविषयांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले जात आहे. याभेटी दरम्यान दोन्ही देश ऐतिहासिक व्यापार करारावर स्वाक्षरी करणार आहेत. तसेच यानंतर द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा देखील दोन्ही नेते घेणार आहेत. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर देखील यावेळी चर्चा होणार आहे.
पंतप्रधानांचा फ्रान्स दौरा - फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. हा मान मिळणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांना हा सन्मान प्रदान केला. अध्यक्षीय प्रासाद ‘एलिसी पॅलेस’मध्ये गुरुवारी मोदींना हा सन्मान व किताब प्रदान करण्यात आला.
हेही वाचा -
- Narendra Modi France : 'आत्मनिर्भर भारत' साठी फ्रान्स महत्त्वपूर्ण भागीदार - पंतप्रधान मोदी
- Pm Modi Conferred Frances Highest Award : पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान; इमॅन्युएल मॅक्रॉनने नरेंद्र मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने केले सन्मानित