महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Pervez Musharraf Death : मुशर्रफ यांनी भारतावर लादले होते कारगिल युद्ध, जाणून घ्या परवेज मुशर्रफ यांची संपूर्ण कारकीर्द

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे आज दुबईत दीर्घ आजाराने निधन झाले. मुशर्रफ यांची संपूर्ण कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहूनही त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानने आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रापासून ते प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रांत अनेक सुधारणा पाहिल्या. त्यांची 'कारगिल युद्धाचे शिल्पकार' अशी देखील ओळख आहे. परवेज मुशर्रफ यांची आत्तापर्यंतची संपूर्ण कारकीर्द एका दृष्टीक्षेपात..

Pervez Musharraf
परवेज मुशर्रफ

By

Published : Feb 5, 2023, 4:27 PM IST

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे दुबईत दुर्मिळ आजाराने निधन झाले. मुशर्रफ हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून अमायलोइडोसिस या आजाराने त्रस्त होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वी दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

फाळणीनंतर पाकिस्तानात स्थलांतरण : दिल्लीतील उर्दू भाषिक मोहाजिर पालकांच्या घरी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले मुशर्रफ, 1947 मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानात स्थलांतरित झाले. मुशर्रफ तीन भावांपैकी दुसरे होते. त्यांचे वडील सय्यद मुशर्रफु-उद-दीन तुर्कीच्या अंकारा येथे तैनात असल्याने त्यांनी 1949 ते 1956 पर्यंत त्यांची सुरुवातीची वर्षे तुर्कीमध्ये घालवली. तुर्कीहून परतल्यावर मुशर्रफ यांनी सेंट पॅट्रिक्स हायस्कूल, कराची आणि नंतर एफ.सी. कॉलेज लाहोरमधून शिक्षण घेतले. ते 1961 मध्ये पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये दाखल झाले आणि 1964 मध्ये त्यांना आर्टिलरी रेजिमेंटमध्ये कमिशन प्राप्त झाले. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी एक तरुण अधिकारी म्हणून लढा दिला आणि 1971 च्या भारत-पाक युद्धात कमांडो बटालियनमध्ये कंपनी कमांडर म्हणून भाग घेतला. मुशर्रफ यांनी 1968 मध्ये लग्न केले आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

पाकिस्तानवर नऊ वर्षे एकछत्री शासन : पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लाहोरमध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत एका ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराच्या अवघ्या काही महिन्यांनंतर भारत व पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्धाचे बिगूल फुंकल्या गेले. जनरल परवेझ मुशर्रफ हे या युद्धाचे मुख्य शिल्पकार होते. कारगिल युद्धात तोंडघशी पडल्यानंतर मुशर्रफ यांनी 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान शरीफ यांना बंडखोरीद्वारे पदच्युत केले. त्यानंतर 1999 पासून ते 2008 पर्यंत ते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी पाकिस्तानवर नऊ वर्षे एकछत्री शासन केले. या काळात त्यांनी स्वतःला एक पुरोगामी मुस्लिम नेता म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला.

देशद्रोहाच्या आरोपानंतर दुबईत आश्रय घेतला : 2008 मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे निवडणुकीची घोषणा करणाऱ्या मुशर्रफ यांना निवडणुकीनंतर राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी दुबईत आश्रय घेतला. 2010 मध्ये त्यांनी स्वत:चा पक्ष ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग स्थापन केला आणि स्वत:ला पक्षाध्यक्ष म्हणून घोषित केले. भविष्यात कधीतरी पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा सक्रियपणे भाग घेण्याची माझी इच्छा आहे, असे ते म्हणायचे. सुमारे पाच वर्षे निर्वासित म्हणून राहिल्यानंतर ते मार्च 2013 मध्ये निवडणूक लढवण्यासाठी पाकिस्तानात परतले. परंतु 2007 मध्ये माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या, पाकिस्तान राज्यघटनेच्या कलम 6 अंतर्गत देशद्रोह आणि बुगती जमातीचे प्रमुख नवाब अकबर खान बुगतीची हत्या यासह वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.

2007 रोजी आणीबाणी लागू केली होती : 2006 मध्ये जनरल मुशर्रफ यांच्या आदेशानुसार पाकिस्तानी लष्कराने माजी कनिष्ठ गृहमंत्री आणि बलुचिस्तानचे राज्यपाल बुगती आणि तेथील दोन डझनहून अधिक आदिवासींना ठार मारले होते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अशांतता पसरली. या घटनेनंतर सीमावर्ती बलुच प्रांतात राष्ट्रवादी भावना वाढीस लागल्या. याच बलुचिस्तानात सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ग्वादर बंदर आहे. 2019 मध्ये मुशर्रफ यांना विशेष न्यायालयाने देशद्रोहासाठी दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मुशर्रफ यांनी 3 नोव्हेंबर 2007 रोजी राज्यघटनेला स्थगिती देऊन देशात आणीबाणी लागू केली होती. पाकिस्तानात देशद्रोहाच्या आरोपाखाली माजी लष्करी अधिकाऱ्याला अशी शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ होती. नंतर लाहोर उच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द केली. मार्च 2016 पासून दुबईत राहणारे मुशर्रफ यांना बेनझीर भुट्टो हत्याकांड आणि लाल मशीद मौलवी हत्या प्रकरणातही फरार घोषित करण्यात आले होते.

संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त राहिली : अमेरिकेवर 9/11 च्या हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या युद्धात मुशर्रफ यांनी अमेरिकेशी युती केली. त्यांनी इस्लामी गटांवर कडक कारवाई करत स्वतःला एक पुरोगामी मुस्लिम नेता दाखविण्याच्या प्रयत्न केला. या काळात त्यांनी डझनभर कट्टरपंथी संघटनांवर बंदी घातली. मात्र त्यांच्या या कृतीमुळे ते कट्टरपंथींयांच्या निशाण्यावर आले. नंतरच्या वर्षांत ते हत्येच्या प्रयत्नातूनही बचावले. त्यांची संपूर्ण कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहूनही त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानने आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रापासून ते प्रशासकीय आणि राजकीय पुनर्रचनेपर्यंत अनेक सुधारणा पाहिल्या. मुशर्रफ यांनी 2001 मध्ये आग्रा शिखर परिषदेसाठी भारताला भेट दिली होती. तसेच 2005 मध्ये भारत-पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना पाहण्यासाठी आणि 2009 मध्ये सत्ता गमावल्यानंतर एका मीडिया कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी भारताला आणखी दोन भेटी दिल्या.

हेही वाचा :Chinese Spy Balloon : अमेरिकेने पाडला चीनचा हेरगिरी करणारा कथित बलून ; चीनकडून निषेध व्यक्त

ABOUT THE AUTHOR

...view details