बिश्केक (किर्गिस्तान) Palestinian Israeli Conflict : हमासच्या हल्ल्यांना तोंड देत इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलंय. मात्र, त्यांनी या समस्येचं निराकरण करण्यासाठी पूर्व जेरुसलेम राजधानी असलेलं स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य निर्माण करण्याची मागणी केलीय. पॅलेस्टाईन-इस्रायली संघर्षावर वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याला पर्याय नाही, अशी भूमिका रशियानं माडल्याचं व्लादिमीर पुतीन यांनी कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स (CIS) परिषदेत बोलताना सांगितलंय.
काय म्हणाले व्लादिमीर पुतीन : यावेळी बोलताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या द्वी-राज्य सूत्राची अंमलबजावणी हे वाटाघाटींचे उद्दिष्ट असलं पाहिजे. स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची निर्मिती करुन पूर्व जेरुसलेमला राजधानी केलं पाहिजे. तसंच त्यांनी इस्रायलबरोबर शांतता आणि सुरक्षिततेनं एकत्र राहणं गरजेचं आहे. सध्या इस्रायल अभूतपूर्व क्रूरतेच्या हल्ल्याखाली आलंय, यात त्याला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार असल्याचंही पुतीन म्हणाले. शांततापूर्ण मार्गानं या समस्येचं निराकरण करण्यासाठी कार्य करणे महत्वाचं असल्याचं पुतीन म्हणाले.
आम्ही हमासला नष्ट करु : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इतर जागतिक नेत्यांनी फोन कॉल्स आणि अनेक माध्यमातून आपल्याला पाठिंबा दिल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. याआधी मी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांना भेटलो. इस्रायलकडं येणारे साहित्य आणि शस्त्रे याद्वारे युद्ध सुरूच राहील, याची आम्ही खात्री करत आहोत. आम्ही हमासला नष्ट करु, आम्ही जिंकू. याला वेळ लागू शकतो, परंतु आम्ही हे युद्ध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करु. तसंच जे शत्रू आमच्या विरोधात डोके वर काढतात, त्यांचा आम्ही नाश करु, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी दिलाय.