इस्लामाबाद(पाकिस्तान) - पाकिस्तानच्या पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या सुमारे डझनभर नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. इम्रान खान यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या आवाराबाहेर खान यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर रविवारी या कटात सहभागी असल्याबद्दल दहशतवाद प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
न्यायालयीन परिसरात तोडफोड - तोशाखाना खटल्याच्या बहुप्रतिक्षित सुनावणीला हजर राहण्यासाठी इम्रान खान हे लाहोरहून इस्लामाबादला आले होते, तेव्हा इस्लामाबाद न्यायालयीन संकुलाबाहेर त्यांचे समर्थक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात राडा झाला होता. शनिवारी पीटीआय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात 25 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी सुनावणी 30 मार्चपर्यंत पुढे ढकलली होती.
एफआयआर दाखल - पीटीआयचे कार्यकर्ते आणि काही नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलने हे वृत्त दिले आहे. इस्लामाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पीटीआयच्या १७ नेत्यांची नावे असल्याचे वृत्त दिले आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, कार्यकर्त्यांनी पोलिस चौकी आणि न्यायालयीन संकुलाचे मुख्य गेट उद्ध्वस्त केले. तसेच परिसराचे मोठे नुकसान केले आहे.