नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित न्यू ग्लोबल फायनान्सिंग पॅक्ट समिटमध्ये भाग घेतला. आपल्या दौऱ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांचीही भेट घेणार आहेत. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या भेटीपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक शहबाज शरीफ यांच्या महिलांशी गैरवर्तन करण्याच्या वृत्तीवर प्रश्न विचारत आहेत.
महिला अधिकाऱ्याच्या हातातून छत्री घेतली : व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पाकिस्तानी पंतप्रधान जेव्हा त्यांच्या कारमधून बाहेर पडतात, तेव्हा मुसळधार पाऊस पडत असतो. प्रोटोकॉलचे पालन करून एक महिला अधिकारी शहबाज शरीफ यांच्या स्वागतासाठी छत्री आणते. महिला अधिकाऱ्याने छत्री अशा प्रकारे धरली होती की ते दोघेही भिजल्याशिवाय आत जाऊ शकतील. पण शाहबाज शरीफ महिला अधिकाऱ्याची छत्री घेतात आणि पुढे निघून येतात. त्यानंतर ती महिला अधिकारी पावसात भिजत आत येते. शाहबाज शरीफ यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर लोक संतापले आहेत. महिलांना अशी वागणूक द्यायची का, असा प्रश्न सोशल मीडिया यूजर्स त्यांना विचारत आहेत. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या कृतीमुळे एका यूजरने त्यांची तुलना कॉमिक कॅरेक्टर मिस्टर बीनशी केली आहे.