नवी दिल्ली:नुकत्याच आलेल्या एका व्हिडिओतून कारगिल रस्ता पुन्हा सुरू करण्याची आणि भारताशी पुन्हा एकीकरणाची मागणी करत गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये एक भव्य रॅली काढली जात असल्याचे दिसत आहे. गेल्या 12 दिवसांपासून या भागात आंदोलन सुरू आहे. पाकिस्तान सरकारच्या भेदभावपूर्ण धोरणामुळे येथील रहिवासी संतापले आहेत. अनेक दशकांपासून पाकिस्तान सरकारने त्यांचे शोषण केल्याचा त्यांचा आरोप आहे.
पारंपरिक मार्ग खुला करण्याची मागणी:पाकव्याप्त काश्मीर (पीओके), गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) मध्ये पीठ आणि अन्न संकटाच्या बातम्यांदरम्यान पुन्हा चर्चेत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) मधील रहिवाशांचा असंतोष दिसून येत आहे. गहू आणि इतर खाद्यपदार्थांवरील अनुदान पुन्हा सुरु करणे, लोडशेडिंग, बेकायदेशीर जमिनीवर कब्जा, परिसरातील नैसर्गिक स्त्रोतांचे शोषण अशा विविध समस्या रहिवाशांनी उपस्थित केल्या आहेत. गिलगिट बाल्टिस्तानमधील रहिवासी मोठ्या प्रमाणात जमून काश्मीर खोऱ्यात व्यापारासाठी पारंपारिक मार्ग उघडण्याची मागणी करत आहेत.
जबरदस्तीने जमिनींवर दावा:जमिनीचा प्रश्न येथे अनेक दशकांपासून सुरू आहे, परंतु 2015 पासून, स्थानिक लोक असा युक्तिवाद करत आहेत की ही जमीन त्यांचीच लोकांची आहे, कारण हा भाग पीओकेमध्ये आहे. मात्र, ही जमीन पाकिस्तानमधील कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करण्यात आली नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे लष्करी प्रशासन गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातील जमीन आणि संसाधनांवर जबरदस्तीने दावा करत आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत असल्याचे दिसत आहेत.