नवी दिल्ली Operation Ajay : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असताना इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन अजय सुरू करण्यात आलंय. या अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन सहावं विमान भारतात पोहोचलंय. सहाव्या फ्लाइटमध्ये एकूण 143 प्रवासी सहभागी होते. तसंच या विमानातून दोन नेपाळी नागरिकही भारतात पोहोचले आहेत. केंद्रीय स्टील आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी दिल्ली विमानतळावर या प्रवाशांचं स्वागत केलंय.
स्वागताची संधी मिळाल्यानं आनंद : सहाव्या विमानानं 143 भारतीय भारतात सुरक्षित परत आल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी आनंद व्यक्त केलाय. नागरिकांच्या स्वागतासाठी मी इथं आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मला तुमचं स्वागत करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. 143 भारतीय संघर्षातून बचावले आहेत, ही दिलासादायक बाब आहे. भारतात येऊ इच्छिणाऱ्या भारतातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय.
- ऑपरेशन अजयचं सहावं विमान : इस्रायली शहरांवर 7 ऑक्टोबर रोजी हमास दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय नागरिकांच्या परतीसाठी 12 ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या 'ऑपरेशन अजय' अंतर्गत हे सहावं उड्डाण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 143 लोक होते. यात दोन नेपाळी नागरिक आणि चार लहान मुलांचाही समावेश आहे.