स्टॉकहोम Nobel Prize 2023 : हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना यंदाचं अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झालंय. त्यांना श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी हा पुरस्कार जाहीर झाला. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस हॅन्स एल्ग्रेन यांनी सोमवारी स्टॉकहोममध्ये या पुरस्काराची घोषणा केली.
क्लॉडिया गोल्डिन यांचं कार्य : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारी गोल्डिन तिसरी महिला आहे. त्या हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. १९८९ ते २०१७ या काळात त्या NBER च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांवरील महत्त्वपूर्ण कामासाठी गोल्डिन ओळखल्या जातात. नोबेल समितीनं पारितोषिकाच्या घोषणेदरम्यान सांगितलं की, गोल्डिन यांच्या संशोधनानं महिलांच्या कमाईबाबत पहिला सर्वसमावेशक लेखाजोखा उपलब्ध करून दिला.
अर्थशास्त्रातील नोबेल जिंकणारी तिसरी महिला :मागील वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल माजी फेडरल रिझर्व्ह चेअरमन बेन बर्नान्के, डग्लस डब्ल्यू. डायमंड आणि फिलिप डायबविग यांना मिळाला होता. त्यांनी २००७-०८ मध्ये अमेरिकेत आलेल्या आर्थिक संकटादरम्यान बँकेच्या अपयशावर संशोधन केलं होतं. आतापर्यंत ९२ जणांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यापैकी फक्त दोन महिला आहेत. क्लॉडिया गोल्डिन या अर्थशास्त्रातील नोबेल जिंकणाऱ्या फक्त तिसऱ्या महिला आहेत.