नवी दिल्ली Nobel Peace Prize 2023 : इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना शुक्रवारी मानवाधिकार आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी शांततेच्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ५१ वर्षीय नर्गिस या 'डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटर'च्या उपसंचालक असून, सध्या त्या तेहरानच्या एविन तुरुंगात आहेत. त्यांना १३ वेळा तुरुंगवास आणि पाच वेळा दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच त्यांना फटके मारण्याची शिक्षाही देण्यात आली. नर्गिस यांना सुमारे ३१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये निदर्शनं : गेल्या वर्षी महसा अमिनी या २२ वर्षीय मुलीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणच्या राजवटीविरुद्ध व्यापक संताप आणि निदर्शनं झाली. यानंतर नर्गिस मोहम्मदी यांना अटक करण्यात आली. नोबेल समितीनं लिहिलं की, 'सप्टेंबर २०२२ मध्ये महसा झिना अमिनीचा इराणच्या नैतिक पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. यानंतर इराणच्या राजवटीविरुद्ध राजकीय निदर्शनं सुरू झाली. आंदोलकांनी स्वीकारलेलं ब्रीदवाक्य - 'महिलांचं जीवन स्वातंत्र्य' नर्गिस मोहम्मदीचं समर्पण आणि कार्य योग्यरित्या व्यक्त करतं, असं समितीनं म्हटलंय.
पत्रकार म्हणून काम केलं : नर्गिस मोहम्मदी यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांनी अभियंता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली. मोहम्मदी आपल्या विद्यार्थीदशेत विद्यार्थी वृत्तपत्रासाठी लिहिताना समानता आणि महिला हक्कांसाठीच्या प्रचारक म्हणून उदयास आल्या. राजकीय विद्यार्थी गटाच्या सभांमधून त्यांना अटकही झाली होती. २००९ मध्ये तुरुंगात गेल्यानंतर त्यांची अभियांत्रिकीची नोकरी गेली. नर्गिस मोहम्मदी यांनी अनेक सुधारणावादी प्रकाशनांसाठी पत्रकार म्हणून काम केलं आहे. फाशीची शिक्षा रद्द करणे, महिलांचे हक्क आणि निषेध करण्याचा अधिकार यासाठी त्यांनी प्रचार केला.