काठमांडू Nepal Earthquake : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय. त्याचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. या विनाशकारी भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत तब्बल 132 जणांचा मृत्यू झालाय. नेपाळमधील रुकुम पश्चिम इथं 28 तर जाजरकोटमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 11.32 च्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील अयोध्येपासून सुमारे 227 किमी उत्तरेस आणि काठमांडूपासून 331 किमी पश्चिम उत्तर-पश्चिम 10 किमी खोलीवर होता. नेपाळमध्ये महिनाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे.
70 लोकांचा आतापर्यंत मृत्यू : शुक्रवारी रात्री उशिरा नेपाळच्या जाजरकोटच्या पश्चिम भागात शक्तिशाली भूकंप झाला. नेपाळच्या नॅशनल सेस्मॉलॉजिकल सेंटरनं सांगितलं की भूकंपाची तीव्रता 6.4 होती, परंतु, जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) ने नंतर त्याची तीव्रता 5.7 पर्यंत खाली आणली आणि यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने त्याची तीव्रता 5.6 असल्याचा अंदाज वर्तवलाय. जाजरकोटमधील भूकंपाच्या केंद्राजवळील भागाशी संपर्क प्रस्थापित करणे शक्य नसल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. हा 1,90,000 लोकसंख्येचा आणि दुर्गम टेकड्यांमध्ये विखुरलेली गावं असलेला डोंगरी जिल्हा आहे. जाजरकोट स्थानिक अधिकारी हरीश चंद्र शर्मा यांनी सांगितलं की त्यांच्या जिल्ह्यात किमान 34 लोकांचा मृत्यू झालाय. तर शेजारच्या रुकुम पश्चिम जिल्ह्यात किमान 35 लोकांचा मृत्यू झाल्याचं पोलीस अधिकारी नामराज भट्टराई यांनी सांगितलं.