राबत Morocco Earthquake :मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री आलेल्या भूकंपामुळं 1 हजार 37 नागरिकांना आपले प्राण मुकावे लागले आहे. या भूंकपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजली गेलीय. या शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्याता वर्तवण्यात आलीय. ॲटलस पर्वतातील गावांपासून माराकेश या ऐतिहासिक शहरापर्यंतच्या इमारतींचं मोठं नुकसान झालंय. सरकारकडून मदत तसंच बचाव कार्य सुरू आहे. भूकंपानंतर काही क्षणातच रस्त्यावर लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
नागरिक इमारतीखाली दबल्याची शक्यता : मोरोक्कोमधील शक्तिशाली भूकंपामुळं मृतांची संख्या 1 हजार 37 वर पोहोचली आहे. मोरोक्कोच्या ॲटलस पर्वतावर शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 1 हजार 37 नागरिकांचा मृत्यू झाला असं वृत्त आहे. या घटनेत अनेक नागरिक इमारतीखाली दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोदींनी केला शोक व्यक्त : मोरोक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पीएम मोदींनी ट्विट करून नागरिकांच्या दु:खात भारत सहभागी असल्याचं म्हटलं आहे. जखमी नागरिक लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रर्थना देखील त्यांनी केलीय. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.