नवी दिल्ली Maldives Presidential Election : मालदीवमध्ये ३० सप्टेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत विद्यमान राष्ट्रपती इब्राहिम सोलिह आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मोहम्मद मुइज्जू यांच्यात निकराची लढत पाहायला मिळतेय. ९ सप्टेंबर रोजी मतदानाच्या पहिल्या फेरीत आठ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला ५० टक्के मतं मिळाली नाहीत. पहिल्या फेरीत मुइज्जू यांना ४६.०६ टक्के तर सोलिह यांना ३९.०५ टक्के मते मिळाली. कोणत्याही उमेदवाराला ५० टक्के मतं न मिळाल्यास रनऑफ घेतला जातो.
चीन समर्थक आणि भारत समर्थक उमेदवारांमध्ये लढत : मोहम्मद मुइज्जू हे मालदीवची राजधानी मालेचे महापौर असून ते पीपल्स नॅशनल काँग्रेस (PNC) आणि प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवचे (PPM) संयुक्त उमेदवार आहेत. ते कट्टर चीन समर्थक मानले जातात. त्यामुळे ते राष्ट्रपती म्हणून निवडून येणं भारतासाठी चिंताजनक असेल. दुसरीकडे, भारत समर्थक इब्राहिम सोलिह हे सत्ताधारी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) चे नेते आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांचा पराभव केल्यानंतर ते निवडणूक लढवण्यास पात्र ठरले होते. निवडणुकीच्या पहिल्या फेरीत चीन समर्थक मुइज्जू यांनी घेतलेल्या आघाडीमुळे ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षीय लढतीकडे भारताचं विशेष लक्ष असेल.
मालदीव भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण : हिंद महासागरातील आपल्या स्थानामुळे मालदीव भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर भारत आणि मालदीव यांच्यात प्राचीन काळापासून सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. तथापि, २००८ पासून मालदीवमधील अस्थिरतेमुळे या संबंधात अनेक उतार-चढाव आले. चीन समर्थक यामीन २०१३ ते २०१८ दरम्यान राष्ट्राध्यक्ष असताना भारत आणि मालदीवमधील संबंध खूपच बिघडले होते. या दरम्यान चीनची या प्रदेशातील सामारिक उपस्थिती वाढली होती. मात्र २०१८ मध्ये भारत समर्थक सोलिह सत्तेवर आल्यानंतर भारत-मालदीव संबंधांमध्ये सुधारणा झाली.
निवडणुकीपूर्वी 'इंडिया आऊट' मोहिम : या निवडणुकीपूर्वी माजी राष्ट्रपती यामीन यांच्या PPM आणि PNC या पक्षांनी 'इंडिया आऊट' मोहिम उघडली होती. भारताची मालदीवमधील गुंतवणूक, दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारी आणि भारताच्या सुरक्षा तरतुदींबद्दल द्वेष पसरवणे हा 'इंडिया आउट'चा उद्देश. मात्र या मोहिमेला मर्यादित पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी एक आदेश जारी करून 'इंडिया आउट' मोहिम 'राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका' असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली.