वॉशिंग्टन (अमेरिका) :वॉशिंग्टन डीसीमध्ये खलिस्तान समर्थकांनी वॉशिंग्टनस्थित भारतीय पत्रकार ललित झा यांच्यावर हल्ला केला. खलिस्तान्यांनी त्यांना शाब्दिक शिवीगाळही केली. स्थानिक वेळेनुसार शनिवारी दुपारी भारतीय दूतावासाबाहेर चालू असलेले खलिस्तान समर्थक निदर्शने ते कव्हर करत होते, त्यावेळी ही घटना घडली.
हल्याचा व्हिडिओ शेअर केला : झा यांनी रविवारी यूएस सीक्रेट सर्व्हिसकडे त्यांच्या संरक्षणाची मागणी केली. तसेच त्यांनी रिपोर्टिंगच्या वेळी संरक्षण देऊन कामात मदत केल्याबद्दल सीक्रेट सर्व्हिसचे आभार देखील मानले. आपल्यावरील हल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, खलिस्तान समर्थकांनी त्यांच्या डाव्या कानावर दोन काठ्या मारल्या. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर खलिस्तानी समर्थकांच्या हल्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
यूएस सीक्रेट सर्व्हिसने सुरक्षा पुरवली : झा यांनी रविवारी ट्विट केले की, यूएस सीक्रेट सर्व्हिसने माझे 2 दिवस संरक्षण केल्याबद्दल धन्यवाद. यामुळे मी माझे काम करू शकलो आहे. नाहीतर मी हॉस्पिटलमधून हे लिहित असतो. त्यांनी लिहिले की, व्हिडिओमध्ये दिसणार्या गृहस्थाने माझ्या डाव्या कानावर दोन काठ्या मारल्या. मला मदतीसाठी हाक मारावी लागली. दोन पोलिसांच्या व्हॅन आल्या आणि त्यांनी मला सुरक्षा पुरवली. झा यांनी एएनआयला सांगितले की, एका क्षणी मला इतकी भीती वाटली की मी 911 वर कॉल केला. त्यानंतर सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी माझ्या मदतीला आले.