ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियातील श्री लक्ष्मी नारायण मंदिरावर खलिस्तान समर्थकांकडून आणखी एकदा हल्ला करण्यात आला आहे. खलिस्तानी समर्थकांनी मंदिराची तोडफोड केली आणि भारतविरोधी घोषणा देखील लिहिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न : स्थानिक मीडियाशी बोलताना मंदिराचे अध्यक्ष सतींदर शुक्ला म्हणाले, 'मंदिराच्या पुजारी आणि भाविकांनी आज सकाळी फोन करून मला आमच्या मंदिराच्या भिंतीच्या तोडफोडीची माहिती दिली. हिंदू ह्युमन राइट्सच्या संचालिका सारा गेट्स म्हणाल्या, 'हा गुन्हा जागतिक स्तरावर शिख फॉर जस्टिस (SFJ) च्या पॅटर्नचे अनुसरण करतो, जो ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. विविध मार्गांनी बेकायदेशीर चिन्हांच्या सहाय्याने हिंदुविरोधी मोहीम राबविण्याचा या संस्थेचा मानस आहे.
यापूर्वीही घडल्या आहेत घटना : यापूर्वी जानेवारी महिन्यातही ऑस्ट्रेलियातील कॅरम डाऊन्स येथील श्री शिव विष्णू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्याचबरोबर भिंतींवर हिंदूविरोधी चित्रे देखील काढली गेली होती. स्थानिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, 'ऑस्ट्रेलियातील तमिळ हिंदू समुदायाने तीन दिवसीय थाई पोंगल सणा साजरा केल्यानंतर 16 जानेवारी रोजी भक्तांनी मंदिराला भेट दिली तेव्हा हे कृत्य उघडकीस आले. 15 जानेवारी 2023 च्या संध्याकाळी, खलिस्तान समर्थकांनी मेलबर्नमध्ये कार रॅलीद्वारे त्यांच्या सार्वमतासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यासाठी दोनशेहून कमी जण जमा झाले होते.