तेल अवीव Israel Palestine Conflict : 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केला आणि मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले. यादरम्यान ते इस्रायलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाले. 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील मृतांची संख्या 1,300 वर पोहोचलीय तर सुमारे 3,300 लोक जखमी झाल्याची माहिती इस्रायलच्या माध्यमांनी दिलीय.
सैन्यदल प्रमुखांची कबुली : आयडीएफचे प्रमुख हर्झी हेलेवी यांनी काल दक्षिण इस्रायलमध्ये सांगितलं की, आयडीएफ देश आणि नागरिकांच्या सुरक्षेची त्यांच्यावर जबाबदारी आहे. आम्ही शनिवारी सकाळी गाझा पट्टीच्या आसपासचा भाग हाताळण्यात अयशस्वी ठरलो. आम्ही यातून शिकू, तपास करू. परंतु आता युद्धाची वेळ आलीय. आयडीएफ हमासच्या दहशतवाद्यांशी लढत असून त्यांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करेल, असंही आयडीएफचे प्रमुख हर्झी हेलेवी यांनी सांगितलंय. एका प्राणघातक, क्रूर आणि धक्कादायक घटनेनंतर हमासच्या दहशतवाद्यांनी आमच्या मुलांची, आमच्या महिला आणि आमच्या लोकांची केलेली क्रूर कत्तल अमानवी आहे. आयडीएफ या निर्दयी दहशतवाद्यांशी लढत आहे. गाझा पट्टीचे शासक याह्या सिनवार यांनी या भयानक हल्ल्याचा निर्णय घेतला. त्यामुळं तो आणि त्याच्या हाताखालील संपूर्ण यंत्रणा नेस्तनाबूत करू. आम्ही त्यांच्यावर हल्ला करू. आम्ही त्यांना नष्ट करू, त्यांची व्यवस्था नष्ट करू, असं यावेळी आयडीएफच्या प्रमुखांनी सांगितलंय.